आठ दिवसांपासून पावसाने दिली ओढ...जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकट 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 24 June 2020

दुबार पेरणीच्या वेळी बियाण्यांच्या कमतरता जाणवून बियाण्यांच्या किमती वाढण्याची भीती आहे. पन्नास टक्के पेरण्या झाल्या आहेत. पाऊस पुन्हा सक्रिय होईल.

जळगाव ः जिल्ह्यात आतापर्यंत झालेला वीस टक्के पाऊस, नंतर पावसाने आठ दिवसांपासून दिलेली ओढ पाहता, जिल्ह्यात शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आ वासून उभे आहे. आतापर्यंत 50 टक्के पेरण्या झालेल्या असून पावसाअभावी रोपांची वाढ खुंटली आहे. काही ठिकाणी अजून उगवण झालेलीच नाही. पाऊस नसल्याने उर्वरित पेरण्या खोळंबल्या आहे. 

जूनच्या सुरवातीस काही दिवस पावसाने चांगली हजेरी लावली. नंतर मात्र एक दिवसांआड पाऊस झाला. गेल्या आठ दिवसांपासून चक्क पाऊसच थांबला आहे. यामुळे वातावरणात असह्य उकाडा होत आहे. रात्रीच्यावेळी ढगाळ वातावरण होते. मात्र पाऊस पडत नाही. 

पन्नास टक्के पेरण्यात, कपाशीचा पेरा अधिक 
आतापर्यंत जिल्ह्यात 3 लाख 18 हजार 200 हेक्‍टरवर पेरण्या झाल्या आहेत. त्यात 3 लाख 38 हजार 133 हेक्‍टरवर कापसाची सर्वाधिक पेरणी झाली. इतर पिकांमध्ये ज्वारी-12 हजार 781 हेक्‍टर, बाजरी 1 हजार 59, मका -30 हजार 737, मूग-6 हजार 515, उडीद-5 हजार 399, विविध प्रकारच्या डाळी-14 हजार 411 आदींचा समावेश आहे. 

पाऊस सक्रिय होईल 
कृषी विभागाच्या अंदाजानुसार जमिनीत ओल असल्याने पेरलेली पिके उगवत होत आहे. मात्र वाढ कमी प्रमाणात आहे. येत्या एक दोन दिवसात पावसाची दमदार सुरवात होईल. यामुळे पिकांची उगवण चांगली होईल. 
तर शेतकऱ्यांचे म्हणणे असे आहे की, जमिनीत ओल आहे सोबतच कडक उन्हाने जमीनही कोरडी पडत आहे. पेरलेल्या बियाण्यांची वाढ खुंटली आहे. 

बियाणे टंचाईची भीती 
बागायतदार विहिरीतून पाणी पिकांना देवू शकतात. मात्र ज्यांच्याकडे कोरडवाहू जमीन आहे ते तर पावसावरच अवलंबून आहेत. पाऊस आता झाला नाही तर दुबार पेरण्यांचे संकट आहे. दुबार पेरणीच्या वेळी बियाण्यांच्या कमतरता जाणवून बियाण्यांच्या किमती वाढण्याची भीती आहे. पन्नास टक्के पेरण्या झाल्या आहेत. पाऊस पुन्हा सक्रिय होईल. दुबार पेरणीचे संकट येऊ नये, अशी आशा करू या. बियाणे, खतांची टंचाई नाही. भरपूर पुरवठा बाजारपेठेत झालेला आहे. 
संभाजी ठाकूर 
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी 

जोरदार पावसाचा अंदाज 
जळगावसह धुळे, नंदुरबार, नाशिक, पुणे, अहमदनगर येथे आज व उद्या (ता.25) वादळीवाऱ्यावर जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. आज एमआयडीसी परिसरात दुपारी जोरदार पाऊस झाला. मात्र शहरात पाऊस झाला नाही. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Crisis of double sowing in the district due to lack of rains