esakal | झेंडूचा इतका भाव कधीच नव्हता..तो दसऱ्याला झाला
sakal

बोलून बातमी शोधा

jalgaon dasara market

मागणी वाढते. मात्र त्या तुलनेत फुलांची आवक सायंकाळपर्यंत हवी तशी न झाल्याने साठ रुपये किलो विकला जाणारा झेंडू चक्क १२० रुपयांपर्यंत पोचला.

झेंडूचा इतका भाव कधीच नव्हता..तो दसऱ्याला झाला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव  : यंदा झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांसह फूल उत्पादकांचे नुकसान झाल्याने ऐन विजयादशमीला आदल्या दिवसापर्यंत झेंडची आवक कमी झाल्याने अपेक्षेप्रमाणे झेंडूचा दर १०० ते १२० रुपयांपर्यंत पोचला. विजयादशमीला झेंडूचे महत्त्व असते. मागणी वाढते. मात्र त्या तुलनेत फुलांची आवक सायंकाळपर्यंत हवी तशी न झाल्याने साठ रुपये किलो विकला जाणारा झेंडू चक्क १२० रुपयांपर्यंत पोचला. विजयादशमीच्या पूर्वसंध्येला शनिवारी (ता.२४) सायंकाळी बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. 

पुर्वसंध्या गर्दीने फुल्‍ल
शुक्रवारपर्यंत चाळीस ते साठ रुपयांपर्यंत मिळणाऱ्या झेंडूचे दर शनिवारी चक्क १०० ते १२० रुपयांपर्यंत वाढले. पूजेसाठी उसाची जोडी लागते. ती ऐंशी रुपयाला मिळत होती. यासोबतच नवीन तयार कपड्यांनाही चांगली मागणी होती. 
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला विजयादशमी अर्थात, दसरा नवीन उपक्रमांची सुरवात, नवीन घरात प्रवेश, कोणत्याही गोष्टीचा प्रारंभ करण्यास चांगला मुहूर्त असतो. यामुळे जो-तो आपापल्या परीने मुलांना, कुटुंबीयांना नवीन कपडे घेतो. कोणी नवीन वाहने, इलेक्ट्रॉनिक वस्तू, टीव्ही, फ्रीज, मोबाईल, संगणक, लॅपटॅाप खरेदी करतो. या दुकानांतही गर्दी असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. 

सोने खरेदीस गर्दी 
महिलांचा यादिवशी नवीन दागिने घेण्यावर भर असतो. त्यामुळे सोने-चांदीच्या बाजारपेठेत यादिवशी तोबा गर्दी असते. सराफ बाजारात विक्रेत्यांनी सोने-चांदीचे नवीन आकर्षक डिझाइनचे दागिने शोरूममध्ये विक्रीस ठेवले आहेत. संभाव्य गर्दी लक्षात घेता सराफ व्यावसायिकांनी त्याप्रमाणात दागिने तयार ठेवले आहेत. 

दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने खरेदीला महत्त्व असते. यामुळे सर्वच प्रकारच्या दागिन्यांमध्ये भरपूर प्रकारचे डिझाइन आम्ही उपलब्ध करून दिले आहेत. ग्राहकांचा आजही चांगला प्रतिसाद होता. रविवारी मुहूर्त असल्याने अधिक प्रतिसाद असेल. 
- सुशील बाफना, संचालक, आर. सी. बाफना ज्वेलर्स. 


ग्राहकांचा सोने खरेदीसह नवरत्न खरेदीलाही चांगला प्रतिसाद आहे. विजयादशमी हा चांगला मुहूर्त आहे. कोरोनाच्या संसर्गातून नागरिक आता हळूहळू बाहेर येत आहेत. रविवारी सोने खरेदीस ग्राहकांचा चांगला प्रतिसाद राहील. 
- अजय ललवाणी, संचालक महावीर ज्वेलर्स