जळगाव शहरात घंटा अन्‌ शंखनादाच्या गजरात मंदिर खुली 

सचिन जोशी
Tuesday, 17 November 2020

अखेरीस मुख्यमंत्र्यांनी दिवाळी पाडव्यापासून (ता. १६) मंदिरं सुरू करण्याची घोषणा केली. त्यानुसार ही मंदिरं सुरू झाली आहेत. 

जळगाव : कोरोनामुळे निर्माण झालेल्या स्थितीत लॉकडाउन जारी झाल्यानंतर तब्बल आठ महिन्यांनंतर राज्यातील देवालयं खुली झाली. कार्तिक प्रतिपदा अर्थात, दिवाळी पाडव्याच्या पवित्र मुहूर्तावर घंटा, शंखनादाच्या गजरात मंदिरांची दारं उघडली आणि भक्तांना आपल्या हरीची भेट घेता आली. 

वाचा- मुलांच्या कपड्यासाठी पैसे कमी दिले आणि विवाहितेने जीवनच संपविले

जूनपासून अनलॉकची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू झाली. मात्र, शाळा-महाविद्यालय व प्रार्थनास्थळे खुली झाली नाहीत. भाविकांची गर्दी टाळण्यासाठी म्हणून सरकारकडून ही काळजी घेण्यात आली. 

आठ महिन्यांनंतर निर्णय 
जूननंतरच्या चार महिन्यांत देशातील अन्य राज्यांमधील मंदिरे व प्रार्थनास्थळे टप्प्याटप्प्याने सुरू झाली असली तरी महाराष्ट्रात ती बंदच होती. त्यामुळे संत-महंतांनी मंदिरं खुली करण्यासाठी सुरवातीला मागणी केली व नंतर आंदोलनेही केली. भाजपने या आंदोलनांना स्वत: सहभाग देत पाठिंबा दिला. अखेरीस मुख्यमंत्र्यांनी दिवाळी पाडव्यापासून (ता. १६) मंदिरं सुरू करण्याची घोषणा केली. त्यानुसार ही मंदिरं सुरू झाली आहेत. 

जळगावातील स्थिती 
शहरातील प्रमुख मंदिरंही आठ महिने बंद राहिल्यानंतर सोमवारपासून उघडली. जुन्या जळगावातील ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थान, बसस्थानकासमोरील चिमुकले श्रीराम मंदिर, ओंकारेश्‍वर मंदिर, मायादेवी मंदिर, शनी मंदिर, मेहरुणमधील महादेव मंदिर, खोटेनगरातील शिवधाम मंदिर आदी देवालयं भक्तांच्या दर्शनासाठी खुली झाले आहेत. सोमवारी या सर्व मंदिरांमध्ये नित्यनियमाप्रमाणे विधिवत पूजाअर्चा होऊन घंटा व शंखनाद गुंजला. चैतन्यमयी वातावरणात भक्तांनी मंदिरांमध्ये प्रवेश केला. भक्तांना प्रवेश देण्यासाठी नियमावली जारी करण्यात आली आहे. 

भाजपची महाआरती 
मंदिरं खुली करण्यासाठी दोन-तीन वेळा आंदोलन करणाऱ्या राज्यातील विरोधी भाजपने सोमवारी या निर्णयाचे स्वागत करत जल्लोष केला. भाजपतर्फे गोलाणी संकुलाजवळील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात महाआरती करण्यात आली. पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुरेश ऊर्फ राजूमामा भोळे, महापौर भारती सोनवणे, महानगराचे अध्यक्ष दीपक सूर्यवंशी, विशाल त्रिपाठी, मनोज भांडारकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांची या वेळी उपस्थिती होती.  

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon decision of the government the temple in Jalgaon city was opened