esakal | महापालिकेतील अनियमिततेच्या कामाच्या चौकशीची करणार मागणी- खडसे 
sakal

बोलून बातमी शोधा

महापालिकेतील अनियमिततेच्या कामाच्या चौकशीची करणार मागणी- खडसे 

महापालिका निवडणुकीच्या काळात आपण मते मागण्यासाठी फिरलो होतो. सत्ता आल्यानंतर जर नागरिकांना सुविधा दिल्या नाहीत, तर आपण याबाबत जाब विचारण्यात आपण पहिले असू.

महापालिकेतील अनियमिततेच्या कामाच्या चौकशीची करणार मागणी- खडसे 

sakal_logo
By
सचिन जोशी

जळगाव : जळगाव महापालिकेतील अनियमिततेबाबत आपल्याकडे शिवसेनेच्या नगरसेवकांनी तक्रारी आणून दिल्या आहेत. याशिवाय इतर कामांच्या अनियमिततेबाबतही तक्रारी आल्या आहेत. त्याची आपण माहिती घेत आहोत. जर त्यात तथ्य आढळले तर कारवाई करण्याबाबत आपण राज्य शासनाकडे दाद मागणार असल्याची माहिती माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी पत्रकारांना दिली. 


येथील शिवरामनगरातील निवासस्थानी ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, की जळगाव महापालिकेतील घनकचरा व्यवस्थापनात वॉटरग्रेसतर्फे अनिमियतता असल्याची तक्रार आपल्याकडे शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत नाईक यांनी आणून दिली आहे. आपल्याला त्यांनी काही कागदपत्रेही दिली आहेत. त्याची आपण माहिती घेत आहोत. त्याशिवाय इतर विभागातील कामात अनियमितता असल्याबाबत आपल्याकडे तक्रारी आल्या आहेत. त्याबाबत आपण माहिती घेत आहोत. त्यात अनियमितता आढळल्यास आपण त्याची चौकशी करण्याची मागणी शासनाकडे करणार आहोत. 

जळगावकरांच्या सुविधांसाठी लक्ष 
जळगावकरांना महापालिकेच्या माध्यमातून सुविधा मिळाव्यात याकडे आपण आता लक्ष देणार आहोत, असे सांगून खडसे म्हणाले, की रस्ते, पाणी, दिवाबत्ती या मूलभूत सुविधा मिळाल्या पाहिजेत, तो त्यांचा हक्क आहे. महापालिका निवडणुकीच्या काळात आपण मते मागण्यासाठी फिरलो होतो. सत्ता आल्यानंतर जर नागरिकांना सुविधा दिल्या नाहीत, तर आपण याबाबत जाब विचारण्यात आपण पहिले असू, असा शब्द त्या वेळी दिला होता. त्याची आठवण खडसेंनी करून दिली. त्यामुळे जनतेला सुविधा देण्याबाबत आपली जबाबदारी आहे. शहरातील नागरिकांच्या तक्रारीबाबत आपण आयुक्तांना पाचारण केले होते. त्यांच्याशी नागरिकांच्या तक्रारीबाबत चर्चा केली होती. त्यांनीही त्या सोडविण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र अजूनही काही नागरिकांच्या मूलभूत सुविधांबाबत तक्रारी असतील तर आपण त्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत. 


शरद पवार धुळे, नंदुरबार दौऱ्यावर 
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार खानदेश दौऱ्यावर येणार असल्याची माहिती एकनाथ खडसे यांनी दिली. ते म्हणाले, की २० नोव्हेंबरला ते धुळे व २१ नोव्हेंबरला नंदुरबार दौऱ्यावर आहेत. या ठिकाणी त्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी अनेकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होईल. जळगाव येथे मात्र शरद पवार यांचा स्वतंत्र दौरा असेल, सागर पार्क मैदानावर त्यांची जाहीर सभा होईल. सध्या कोविडमुळे परवानगी नाही. मात्र लवकरच जळगावात त्यांची मोठी जाहीर सभा होईल, असेही खडसे यांनी सांगितले. 
 

संपादन- भूषम श्रीखंडे