वीस वर्षात पहिल्यांदा लोकप्रतिनीधी आले, समस्या देखिल जाणून घेतल्या याचा नागरिकांमध्ये झाला आनंद !

भूषण श्रीखंडे
Thursday, 3 December 2020

गेल्या २० वर्षापासून आम्ही या परिसरात राहतो. आजवर कोणत्याही लोकप्रतिनिधीने आमच्याकडे ढुंकून देखील पाहिले नव्हते.

जळगाव :  'उपमहापौर आपल्या दारी' हा उपक्रम उपमहापौर सुनील खडके यांनी आठ दिवसापासून हाती घेतला आहे. त्यां अंतर्गत जळगाव शहरातील उपमहापौरांनी प्रभाग ८ मध्ये भेट दिली. यात चंदुअण्णा नगरातील भेटी दरम्यान पहिल्यांदाच लोकप्रतिनिधी आलेले पाहून व आपल्या समस्या जाणून घेत असल्याच्या आनंद तेथील नागरिकांना झाला. 

आवश्य वाचा- तलाठी आप्पाची रिेकॉर्डींग झाली व्हायरल; आणि त्‍यांची ततफफ.. 

'उपमहापौर आपल्या दारी' उपक्रमांतर्गत उपमहापौर सुनील खडके यांनी प्रभाग ८ मधील विविध परिसराला भेट देत नागरिकांशी चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत महिला व बालकल्याण सभापती रंजना सपकाळे, नगरसेवक डॉ.चंद्रशेखर पाटील, प्रतिभा पाटील, ऍड.शुचिता हाडा, मिनाक्षी पाटील, अमित काळे, भारत कोळी, सुधीर पाटील, मनोज काळे आदींसह मनपा अधिकारी उपस्थित होते.

कचऱ्याची विल्हेवाट योग्य प्रकारे लावावी
आव्हाणे शिवारातील कचरा फॅक्टरी रस्त्यावर असलेल्या पवार पार्कच्या रहिवाशांनी कचरा डम्पिंग ग्राउंड ऐवजी रस्त्यावर टाकला जातो अशी तक्रार केली असता उपमहापौर श्री. खडके यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. तसेच पवार पार्क येथे सफाईचे काम व्यवस्थित करण्याचे तसेच परिसरात रस्ते नसल्याने रस्त्यांसाठी डब्ल्यूबीएमचा प्रस्ताव तयार करण्याच्या सुचना दिल्या. पाण्याची गंभीर समस्या नागरिकांनी मांडल्याने शहर अभियंता यांनी मार्च अखेरपर्यंत परिसराला नियमित पाणी पुरवठा होईल अशी माहिती दिली.

पथदिवे तात्काळ दुरुस्त करा
प्रभाग ८ मध्ये अनेक ठिकाणी पथदिवेच नाही तर काही पथदिवे अनेक दिवसापासून बंदवस्थेत असल्याची तक्रार नागरिकांनी मांडली. उपमहापौर सुनील खडके यांनी लागलीच संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देत पथदिवे दुरुस्त करण्याचे सांगितले.

वाचा - पाणीपुरवठा योजनेत गैरव्यवहार; चौकशीची प्रतिक्षा 

पहिल्यांदा लोकप्रतिनिधीने दिली भेट
गेल्या २० वर्षापासून आम्ही या परिसरात राहतो. आजवर कोणत्याही लोकप्रतिनिधीने आमच्याकडे ढुंकून देखील पाहिले नव्हते. आज पहिल्यांदा उपमहापौर आले आणि आमच्या परिसरातील कामे होतील तेव्हा होतील परंतु उपमहापौरांनी आमची विचारपूस केली आणि समस्या जाणून घेतल्या याचा आम्हाला आनंद आहे.असे परिसरातील नागरिकांनी मत व्यक्त केले.

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon deputy mayor people's representatives first time