esakal | फडणवीसांनी केली खडसेंच्या पक्षांतराच्या ‘डॅमेज कंट्रोल’ची चाचपणी
sakal

बोलून बातमी शोधा

फडणवीसांनी केली खडसेंच्या पक्षांतराच्या ‘डॅमेज कंट्रोल’ची चाचपणी

देवेंद्र फडणवीसांवर बिहार विधानसभा निवडणुकीची जबाबदारी आहे. त्यात ते व्यस्त असताना त्यांनी मंगळवारी केवळ जामनेरातील या सोहळ्यासाठी हजेरी लावली.

फडणवीसांनी केली खडसेंच्या पक्षांतराच्या ‘डॅमेज कंट्रोल’ची चाचपणी

sakal_logo
By
सचिन जोशी

जळगाव : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मंगळवारचा दौरा जामनेरातील ग्लोबल हॉस्पिटलच्या लोकार्पणासाठी असल्याचे दिसत असले तरी या दौऱ्यातून खडसेंच्या संभाव्य पक्षांतराने भाजपला किती ‘डॅमेज’ होऊ शकते, याची चाचपणी या दौऱ्यातून केल्याचे सांगितले जात आहे. 

आवश्य वाचा- मोठा दिलासा; जळगाव जिल्ह्यातील दुकाने आता सात ही दिवस खुली राहणार !
 

माजी मंत्री गिरीश महाजनांच्या पुढाकाराने जामनेरात ग्लोबल महाराष्ट्र मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे लोकार्पण मंगळवारी माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. हे हॉस्पिटल तयार होऊन चार-सहा महिने झाले; मात्र कोरोनामुळे त्याचे लोकार्पण लांबले. मध्यंतरी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण करण्याचे ठरले होते; मात्र काही कारणास्तव ते रद्द झाले. अखेरीस मंगळवारचा मुहूर्त त्यासाठी साधण्यात आला. 

हॉस्पिटल केवळ निमित्त 
खरेतर फडणवीसांवर बिहार विधानसभा निवडणुकीची जबाबदारी आहे. त्यात ते व्यस्त असताना त्यांनी मंगळवारी केवळ जामनेरातील या सोहळ्यासाठी हजेरी लावली. अर्थात, हॉस्पिटलच्या लोकार्पणाचे निमित्त असले तरी सध्या त्यांच्यावर नाराज असलेल्या ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसेंच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू झाली असून, या राजकीय धमाक्यानंतर भाजपला खानदेशात किती नुकसान होऊ शकते, याचा आढावा घेण्यासाठी फडणवीस आल्याचे बोलले जात आहे. 

खडसेंच्या शक्तीची चाचपणी 
खडसेंना जळगाव जिल्ह्यातच नव्हे तर खानदेश व उत्तर महाराष्ट्रात मानणारा मोठा वर्ग आहे. विदर्भ, मराठवाड्यातही त्यांचे समर्थक आहेत. शिवाय, गेल्या काही वर्षांत भाजपत नवे व जुने असा वाद निर्माण होऊन जुन्यांना डावलले जात असल्याने निष्ठावंतांचा मोठा वर्ग राज्यातील नेतृत्वावर नाराज आहे. अशा नाराजांची मोटही खडसे बांधू शकतात. तसेच खडसे हे भाजपचा बहुजन चेहरा आहेत, त्यामुळे बहुजन समाजातील समर्थकांची नेमकी काय भूमिका आहे, याचीही फडणवीस व नेतृत्वाने यानिमित्ताने चाचपणी सुरू केली आहे.

आवर्जून वाचा- पाया खोदता खोदता अचानक मडके दिसले; आणि मडक्यात निघाली राणी व्हिक्टोरियाची मुद्रा ! 

खानदेशचा आढावा 
फडणवीसांनी खडसेंच्या संभाव्या पक्षांतरामुळे भाजपतील ‘डॅमेज कंट्रोल’ची चाचपणी या दौऱ्यातून केली. खडसेंसोबत जिल्ह्यातून व खानदेशातून कोण जाऊ शकते, याचा आढावा मंगळवारी गिरीश महाजनांच्या निवासस्थानी घेण्यात आला. महाजनांकडील बैठकीस जिल्ह्यातील सर्वच आमदार- खासदार, धुळ्याचे खासदार डॉ. सुभाष भामरेही उपस्थित होते. खानदेशातील विद्यमान आमदार, खासदारांपैकी कुणी खडसेंसोबत जाणार नसल्याची ग्वाही या बैठकीतून घेण्यात आल्याचे कळते. 


हॉस्पिटलच्या जाहिरातीतून संकेत 
मुळातच पक्षांतर बंदीच्या कायद्याची अडचण असल्याने आमदार, खासदार अथवा कुणी लोकप्रतिनिधी खडसेंसोबत राजीनामा देऊन जाण्याची रिस्क सध्या घेणार नाही. त्यासाठी जामनेरच्या हॉस्पिटल लोकार्पणाच्या जाहिरातीत आवर्जून सर्व आमदार, खासदारांचे फोटो व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील भाजपच्या पदाधिकाऱ्यांची नावे आवर्जून प्रसिद्ध करण्यात आली. त्यांना जाणीवपूर्वक बोलाविण्यात आले होते. त्यातून खडसेंसोबत कोण जाऊ शकते, याची चाचपणी करण्यात आली.  

संपादन- भूषण श्रीखंडे