
अट शिथिल करण्यात आली असून सोमवार ते रविवार असे सातही दिवस बाजारपेठ सकाळी 9 ते रात्री 9 यावेळेस सुरू राहणार आहे.
जळगाव : मिशन बिगीन अगेनअंतर्गत सूट देत व अर्थचक्रास गती देण्यासह गर्दी टाळण्यासाठी 15 ऑक्टोबर 2020 पासून सप्ताहातील सातही दिवस सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. या संदर्भातील आदेश बुधवारी रात्री जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी काढले आहेत.
यासोबतच ग्रंथालय आठवडे बाजार देखील सुरू करण्यास परवानगी देण्यात आली असून शाळांमध्ये 50 टक्के शिक्षकांना उपस्थित राहता येणार आहे. 15 ऑक्टोबर पासूनच याची अंमलबजावणी होणार आहे. तसेच चित्रपट गृह, धार्मिक स्थळे, शाळा महाविद्यालय मात्र बंदच राहणार आहेत.
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी 31 आॅक्टोबर 2020 पर्यंत वाढवण्यात आला असला तरी मिशन बिगिन अगेनअंतर्गत टप्प्याटप्प्याने निर्बंध उठवण्यासाठी विविध सुधारणा जाहीर करण्यात आल्या होत्या. त्यानुसार 14 ऑक्टोबर रोजी राज्य सरकारने आदेश काढल्यानंतर जिल्हा प्रशासनाने देखील आदेश जारी केले. त्यानुसार आता ग्रंथालय सुरू होणार आहे. यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून नियमावली जारी करण्यात येणार आहे.यासोबतच आठवडे बाजार, बगीचे पार्क मोकळ्या जागा मनोरंजनासाठी सुरू ठेवता येणार आहेत.
जळगावात शनिवार व रविवार बाजारपेठ बंद राहात होती. आता ही अट शिथिल करण्यात आली असून सोमवार ते रविवार असे सातही दिवस बाजारपेठ सकाळी 9 ते रात्री 9 यावेळेस सुरू राहणार आहे.
शाळांमधील 50 टक्के शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना ऑनलाइन शिक्षण, टेली काउंसलिंग व शाळेतील इतर कामकाजासाठी शाळेत उपस्थित राहण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. मात्र यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून नियमावली निर्गमित करण्यात येईल. यासोबतच विज्ञान शाखेच्या पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्यांना व पीएचडीसाठी उपस्थित राहण्याचीदेखील मुभा देण्यात आली आहे.
संपादन- भूषण श्रीखंडे