एक नारद आणि शिवसेना गारद : फडणवीस 

सचिन जोशी
गुरुवार, 9 जुलै 2020

कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे लोक घरात बसले आहेत. पण आम्ही फिरणार व लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्नही करणार, जनतेच्या हितासाठी हे राजकारण असेल तर आम्ही ते नक्कीच करू, असा टोला त्यांनी लगावला.

जळगाव : सध्या एक शरद बाकी सर्व गारद या संभाव्य मुलाखतीची खूप चर्चा होतेय. पण सर्व गारदमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पण आहेत का? हे बघावे लागेल. पण आता या मुलाखतीसोबत एक नारद शिवसेना गारद असाही मेसेज फिरू लागल्याची टिका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगावात केली. 
जळगाव जिल्ह्यात कोविडमुळे उद्भवलेल्या स्थितिचा आढावा घेण्यासाठी ते आले होते. सोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. 
कोरोना संसर्गात लोकांना भडकविण्यासाठी आपण दौरे करून राजकारण करताय असा आरोप होत असल्याबाबत ते म्हणाले, की कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे लोक घरात बसले आहेत. पण आम्ही फिरणार व लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्नही करणार, जनतेच्या हितासाठी हे राजकारण असेल तर आम्ही ते नक्कीच करू, असा टोला त्यांनी लगावला. 

फोडाफोडीचे राजकारण नको 
राज्य आणि संपुर्ण देश कोरोनाशी झगडतोय. अशा परिस्थितीत फोडाफोडीचे राजकारण करण्याची गरज नाही. मुळात कोरोनाशी लढायला हवे; असे होत नसून सत्तेतील तीनही पक्ष मात्र एकमेकांशी भांडताय हे योग्य नसल्याचे फडणवीस म्हणाले. 

मराठा आरक्षणाबाबत 
मराठा आरक्षणासंदर्भात कोर्टाने 15 तारीख दिली आहे. याबाबत राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले पाहिजेत. वकिलांच्या माध्यमातून जास्तीत जास्त विषय मांडून कुठलाही विपरीत निर्णय होणार नाही; या दृष्टीने राज्य सरकारने काळजी घ्यायला हवी. त्या संदर्भात राज्य सरकारला आमची पुर्णपणे साथ असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. 

संपादन : राजेश सोनवणे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon devendra fadnavis tour jalgaon corona update and target sena