esakal | जळगाव- धुळे महामार्गावर होणार ट्रामा सेंटर; जखमींना तात्‍काळ उपचाराची सोय 
sakal

बोलून बातमी शोधा

trauma center

ट्रामा केअर सेंटर उभारण्यात येण्याचे नियोजन आहे. त्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांनी महामार्ग विभागास तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले. 

जळगाव- धुळे महामार्गावर होणार ट्रामा सेंटर; जखमींना तात्‍काळ उपचाराची सोय 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : रस्ते अपघातात जखमी होणाऱ्या नागरीकांना तातडीने उपचार मिळावेत, यासाठी जळगाव-धुळे राष्ट्रीय महामार्गावर एरंडोल अथवा पारोळा याठिकाणी ट्रामा केअर सेंटर उभारण्यात येण्याचे नियोजन आहे. त्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांनी महामार्ग विभागास तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले. 
जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक जिल्हाधिकारी श्री. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पार पडली. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक सी. एम. सिन्हा, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही, वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक देविदास कुनगर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत सोनवणे, उपअभियंता स्वाती भिरुड यांचेसह महापालिका, आदी उपस्थित होते. 

हेल्मेट सक्ती आवश्‍यक 
जिल्ह्यातील अपघातांचे प्रमाण कमी होण्यासाठी सर्व शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालये, मोठ्या आस्थापना, एमआयडीसीमधील उद्योग, बँका, विद्यापीठ, महाविद्यालयात विविध कामासाठी येणारे नागरिक, विद्यार्थी यांना नो हेल्मेट, नो एन्ट्री हे तत्व अवलंबण्याच्या सूचना द्याव्यात. एसटी महामंडळाच्या बस ह्या थांब्यावर न थांबता इतरत्र थांबतात त्यामुळेही अपघात होऊ शकतात, त्यासाठी बस थांब्यावरच थांबविण्याच्या सूचना देण्यात आल्यात. ओव्हरटेक करताना अनेक अपघात होतात, याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाने अपघाताची स्थळे दर्शविणारे फलक रस्त्यांवर तात्काळ लावण्याचे निर्देशही त्यांनी दिलेत. 

अपघात २३ टक्क्यांनी घटले 
मागील वर्षीपेक्षा यावर्षी जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण २३ टक्क्यांनी घटले आहे. ऑगस्ट -२०१९ पर्यंत जिल्ह्यात ५८९ अपघातात ३०८ व्यक्तींचा मृत्यू, ५९३ व्यक्ती जखमी झाल्या होत्या. ऑगस्ट-२०२० मध्ये ४५३ अपघात झाले असून यात ३०१ मृत्यू तर ३३२ व्यक्ती जखमी झाल्या आहेत. 
 
फागणे- तरसोद कामाचा वेग वाढवा 
तरसोद-चिखली रस्त्यांचे काम गतीने सुरु असून फागणे- तरसोद रस्त्याचे कामही वेगाने पूर्ण करावेत. काम सुरु असताना वाहनचालकांसाठी आवश्यक त्या सूचना, चिन्हे रस्त्यावर लावण्याचे निर्देशही देण्यात आले. महानगरपालिका हद्दीतील रसत्याच्या मधोमध अथवा कडेला असलेल्या इलेक्ट्रिक पोल स्थलांतर करणे, सदोष वाहनांवर कारवाई करणे, त्याचबरोबर जळगाव-धुळे रस्त्यांवरील खड्डे त्वरीत भरण्यात यावेत, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.