esakal | सकाळ ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात 24 तासांत कोरोनाचे 13 बळी 
sakal

बोलून बातमी शोधा

sakal breaking

जळगाव शहरात आतापर्यंत 172 बाधित रुग्ण आढळून आले आहे. शहरालगत असलेल्या ग्रामीण भागात देखील कोरोनाचा शिरकाव झाला असून, याठिकाणी आज पर्यंत 24 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. दिवसेंदिवस या संख्येतही वाढ होत आहे. 

सकाळ ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात 24 तासांत कोरोनाचे 13 बळी 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : राज्यात कोरोनाग्रस्तांचे सर्वाधिक मृत्यूचे प्रमाण जळगाव जिल्ह्यात असल्याचे समोर आले असून, गेल्या 24 तासांत जिल्ह्यात कोरोनामुळे 13 जणांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याशिवाय आज 24 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या ही 762 वर पोचली आहे. 

जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. तशी कोरोना बळींची संख्याही झपाट्याने वाढत आहे. गेल्या 24 तासांत जिल्ह्यात 13 बाधितांचा बळी गेला असून, आतापर्यंतच्या बळींची संख्या ही 94 वर पोचली आहे. जिल्ह्यात आज आढळलेल्या 24 रुग्णांमध्ये जळगाव शहरात 5, जळगाव ग्रामीण 5, भुसावळ 4, भडगाव 5, रावेर 2, तर अमळनेर, यावल, जामनेर याठिकाणी प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. 

मृत्यूंमध्ये भुसावळ अग्रेसर 
जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्ण हे जळगाव, भुसावळ व अमळनेर तालुक्‍यात आढळून आले आहेत. यातील सर्वाधिक मृत्यू भुसावळ तालुक्‍यात झाले असून, तेथील 27 जणांचा मृत्यू झाला आहे. जळगावातील 15, तर अमळनेरमधील 16 जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक बाधित मृत्यूंच्याबाबत भुसावळ हे अग्रेसर दिसत आहे. 

आता तरी दखल घ्यावी 
राज्यासह देशभरातील बाधित मृत्यूचे प्रमाण साडेतीन टक्के इतके आहे. मात्र, जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचे प्रमाण हे सुरवातीपासूनच वाढीव होते. गेल्या काही दिवसांपूर्वी हे प्रमाण 10 टक्‍क्‍यांपर्यंत होते. मात्र यामध्ये आता दिवसेंदिवस वाढ होत असून, सद्यःस्थितीत मृत्यूचे प्रमाण हे 12 टक्‍क्‍यांवर आले आहे. आता तरी आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनाने मृत्यू रोखण्यासाठी या प्रकाराची गंभीर दखल घेणे आवश्‍यक आहे. 

बरे होणाऱ्यांची संख्या निम्म्यावर 
ज्याप्रमाणे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. त्याचप्रमाणे हे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढू लागले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात सध्या 352 जणांवर वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू असून, 316 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे बरे होणाऱ्यांची संख्या आता निम्म्यावर येऊन पोचली आहे. 

loading image
go to top