
मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिल्यानंतर कानातील सोन्याचे रिंग चोरीला गेल्याचे कुटुंबाच्या निदर्शनास आले. त्यानंतर मृत महिलेच्या मुलाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांना चौकशीसाठी पत्र दिले.
जळगाव : फर्दापूर येथील महिलेचा जळगाव येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत महिलेच्या कानातील दहा ग्रॅमची सोन्याची रिंग चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला. मृत महिलेच्या कानातील रिंग अक्षरश: ओरबाडल्याने कानाला जखम झाली आहे. या गंभीर व धक्कादायक प्रकाराची चौकशी व्हावी, अशी मागणी महिलेच्या कुटुंबीयांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
फर्दापूर येथील इंदूबाई माणिक देवकर यांना न्यूमोनिया झाल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला. मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिल्यानंतर कानातील सोन्याचे रिंग चोरीला गेल्याचे कुटुंबाच्या निदर्शनास आले. त्यानंतर मृत महिलेच्या मुलाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांना चौकशीसाठी पत्र दिले. या प्रकाराने कोरोना मृत्यू प्रकरणात मृतदेहावरील दागिने आणि मौल्यवान वस्तू लांबवल्याचा धंदाच जिल्हा रुग्णालयात चालवला जात असल्याची चर्चा आहे.
पून्हा महाविद्यायातील कारभार प्रश्नचिन्ह
महिलेचा शौचालयात मृत्यू नंतर चक्क मृतदेहाच्या अंगावरील दागिने ओरबडल्याच्या प्रकारामुळे पुनश्च एकदा जिल्हा रुग्णालय व शासकिय वैद्यकीय महाविद्यालय चर्चेत आले आहे. वाकोद-पहूर गटाचे जिल्हा परिषद सदस्य अमित देशमुख यांनी मृतदेहाची विटंबना करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.
संपादन- भूषण श्रीखंडे