फेरफार नोंदी निर्गती करण्यात जळगाव राज्यात प्रथम 

देविदास वाणी
Thursday, 15 October 2020

जळगाव जिल्ह्यात दौऱ्यातील आढावा बैठकीमध्ये तहसीलदार व प्रांताधिकारी यांना ई- फेरफार प्रकल्पांतर्गत प्रलंबित फेरफार नोंदी निर्गती करण्याच्या सूचना दिल्या होत्या. १ ऑक्टोबरला जळगाव जिल्ह्यात पाच लाख ९४ हजार ६०३ फेरफार नोंदी निर्गत करण्यात आल्या होत्या.

जळगाव : राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत ई- फेरफार आज्ञावली हा महाराष्ट्र शासनाचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. ग्रामीण भागातील शेतकरी आणि जनतेसाठी हा प्रकल्प अतिशय जिव्हाळ्याचा आहे. या प्रकल्पांतर्गत फेरफार निर्गतीमध्ये जळगाव जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली. 
फेरफार निर्गतीमध्ये जळगाव जिल्ह्यापाठोपाठ वाशिम दुसऱ्या, अकोला तिसऱ्या, बुलढाणा चौथ्या, तर नाशिक जिल्हा पाचव्या क्रमांकावर असल्याचेही जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले. नाशिक विभागीय आयुक्तांनी जळगाव जिल्ह्यात दौऱ्यातील आढावा बैठकीमध्ये तहसीलदार व प्रांताधिकारी यांना ई- फेरफार प्रकल्पांतर्गत प्रलंबित फेरफार नोंदी निर्गती करण्याच्या सूचना दिल्या होत्या. १ ऑक्टोबरला जळगाव जिल्ह्यात पाच लाख ९४ हजार ६०३ फेरफार नोंदी निर्गत करण्यात आल्या होत्या. तर, १८ हजार ९७४ नोंदी निर्गतीकरणासाठी प्रलंबित होत्या. प्रमाणिकरणाची एकूण टक्केवारी ८९.९४ टक्के होती. त्यानंतर १ ते १३ ऑक्टोबर या १२ दिवसांत पाच हजार ४७२ नवीन फेरफार दाखल करून घेण्यात आले, तर १३ हजार चार फेरफार नोंदी निर्गत करण्यात आल्या. तरी अद्यापही ११ हजार ४४२ फेरफार निर्गत होण्यास प्रलंबित आहेत. 

प्रमाणिकरणाची टक्‍केवारी ९८ टक्‍यांवर
प्रमाणिकरणासाठी कालावधी पूर्ण न झालेल्या, तसेच, वादग्रस्त, तक्रार फेरफार यांचा समावेश आहे. जळगाव जिल्ह्यात आजतागायत पाच लाख ५१ हजार ५५ फेरफार दाखल करून घेण्यात आलेल्या आहेत. तर सहा लाख सात हजार ६०७ फेरफार नोंदी निर्गत करण्यात आलेल्या आहेत. प्रमाणिकरणाची टक्केवारी ९८.४६ एवढी आहे. 

तालुकानिहाय फेरफार प्रमाणिकरण असे (टक्के) 
- जळगाव - ९७.५७ 
- चोपडा - ९९.०४ 
- चाळीसगाव - ९८.६० 
- जामनेर - ९८.०७ 
- रावेर - ९८.६५ 
- भुसावळ - ९९.२३ 
- पारोळा - ९८.५० 
- भडगाव - ९८.०२ 
- अमळनेर - ९९.२१ 
- पाचोरा - ९८.११ 
- यावल - ९९.२० 
- एरंडोल - ९८.७९ 
- मुक्ताईनगर - ९८.९० 
- बोदवड - ९८.५७ 
- धरणगाव - ९९.०५ 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon district first in state modification logs Issue