esakal | जळगाव जिल्ह्यात आजपासून ‘अनलॉक’ नाहीच!
sakal

बोलून बातमी शोधा

 Lockdown

जळगाव जिल्ह्यात आजपासून ‘अनलॉक’ नाहीच!

sakal_logo
By
टीम ई सकाळ

जळगाव : पॉझिटिव्हिटी रेट कमी असलेल्या जिल्ह्यांमध्ये लॉकडाउन (Jalgaon Lockdown) हटवून ‘अनलॉक’ (Unlock)करण्याबाबत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या बातम्या विविध वृत्तवाहिन्यांवर झळकत असल्या तरी जळगाव जिल्ह्यात लगेच शुक्रवारपासून (ता.३०) अंमलबजावणी होण्याची शक्यता कमीच आहे. जिल्हा प्रशासनाला ( Jalgaon District Administration)अद्याप यासंदर्भात आदेश प्राप्त नसून शुक्रवारी नियमित सद्य:स्थितीतील निर्बंध कायम असतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

(jalgaon district government no order from lockdown restrictions continue)

हेही वाचा: शेतरस्त्याच्या वादातून भावानेच भावावर केला गोळीबार


कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात, राज्यात व पर्यायाने जळगाव जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात हानी पोचवली. त्याअन्वये राज्य सरकारने गेल्या मार्चमध्ये लॉकडाउन जाहीर केले. मेपासून कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली. मे व जूनमध्ये संसर्ग पूर्णपणे नियंत्रणात येत असल्याचे परिणाम समोर आले. त्यामुळे जूनमध्ये राज्यातील काही जिल्ह्यांत अनलॉकची प्रक्रिया सुरू करून निर्बंध शिथिल करण्यात आले.

जळगावात अनलॉकनंतर पुन्हा निर्बंध
दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी झालेल्या व पॉझिटिव्हिटी पाच टक्क्यांपेक्षा खाली आलेल्या जिल्ह्यांत जूनमध्ये ‘अनलॉक’ करण्यात आले. जळगाव जिल्हाही त्यात अनलॉक होऊन बाजारपेठ सुरळीत सुरू झाली होती. मात्र, जूनअखेरच्या आठवड्यात पारोळा तालुक्यातील एका गावातील बरे झालेल्या रुग्णांमध्ये कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग आढळून आल्यानंतर २६ जूनपासून जिल्ह्यात पुन्हा निर्बंध जारी करण्यात आले.

हेही वाचा: जळगाव जिल्ह्यातील बहुतांश तालुके कोरोनामुक्तीकडे

असे होते निर्बंध
२६ जूनपासून जिल्ह्यात सोमवार ते शुक्रवार सर्व प्रकारची दुकाने केवळ दुपारी चारपर्यंतच सुरू ठेवणे, शनिवार व रविवार पूर्ण दुकाने बंद, उद्याने, नाट्यगृह, चित्रपटगृह, प्रार्थनास्थळे, शाळा, महाविद्यालये बंद असे निर्बंध होते.

पॉझिटिव्हिटी दोन टक्क्यांच्या आत
महिन्यापासून जिल्ह्यातील कोरोना संसर्ग पूर्णपणे नियंत्रणात आल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेटही दोन टक्क्यांपेक्षा कमी आणि पंधरा दिवसांनंतर तर तो एक टक्क्याहून कमी आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांकडून निर्बंध शिथिल करण्याची मागणी होत होती.

राज्यात निर्णय, आदेशाची प्रतीक्षा
दरम्यान, गुरुवारी राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात सरकारचा निर्णय झाल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केले. मात्र, सरकारच्या अधिकृत आदेशाची जिल्हा प्रशासनाला प्रतीक्षा आहे. आदेश प्राप्त होईपर्यंत जिल्ह्यात नियमित जे निर्बंध जारी होते, तेच राहतील. राज्य सरकारच्या आदेशानंतर जिल्ह्यात अनलॉक प्रक्रियेबाबत स्वतंत्र आदेश काढण्यात येणार आहे. व्यावसायिक मात्र वृत्तवाहिन्यांच्या वृत्तांवरून शुक्रवारपासून दुकाने किती वेळ सुरू ठेवायची, याबाबत संभ्रमात आहेत.

हेही वाचा: छत्तीसगडचे ही आहेत अतिशय सुंदर हिल स्टेशन


जिल्ह्यातील अनलॉकबाबत शासनाचे लेखी आदेश प्राप्त झाल्यानंतर निर्बंध शिथिल करण्यात येतील व त्यासंबंधी स्वतंत्र आदेश काढण्यात येईल, अद्याप तरी सरकारकडून असे आदेश प्राप्त नाहीत.
- अभिजित राऊत, जिल्हाधिकारी

loading image
go to top