esakal | जळगाव जिल्ह्यातून म्युकरमायकोसिस हद्दपारीच्या दिशेने
sakal

बोलून बातमी शोधा

Mucormycosis

जळगाव जिल्ह्यातून म्युकरमायकोसिस हद्दपारीच्या दिशेने

sakal_logo
By
देविदास वाणी


जळगाव : जिल्ह्यात कोरोना (Corona) संसर्गाची स्थिती नियंत्रणात येत असताना आता त्यामुळे उद्‌भवणाऱ्या म्युकरमायकोसिस या घातक आजाराने पीडित रुग्णसंख्याही घटली असून, या रोगाचीही हद्दपारीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. कोरोना संसर्गाची दुसरी लाट तीव्र असताना बाधित रुग्ण बरे झाल्यानंतर त्यांना म्युकरमायकोसिसची (Mucormycosis) बाधा होत असल्याचे समोर आले होते. राज्यभरात या आजाराचे रुग्ण एप्रिल, मे महिन्यात मोठ्या संख्येने वाढले. कोरोनातून बरे झाल्यानंतर ‘म्युकर’ होऊन अनेक जण दगावल्याचीही उदाहरणे आहेत. त्यामुळे या आजाराचाही रुग्णांनी चांगलाच धसका घेतला होता.

हेही वाचा: रस्ता बंद..म्हणून पतीने खांद्यावर पत्नीला उचल्ले, पण वाटेतच मृत्यू

‘म्युकर’चे रुग्णही होते अधिक
‘म्युकर’चे रुग्ण आढळू लागल्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात आतापर्यंत चारशेवर रुग्णांची तपासणी झाली. त्यांपैकी ११२ रुग्ण प्रत्यक्ष रुग्णालयात दाखल झाले. पैकी दोघांचा मृत्यू झाला, तर १२ रुग्णांवर शस्त्रक्रिया होऊन ते बरे होऊन घरी गेले. अन्य ९८ रुग्ण संदर्भाने अन्य हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेले, तर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयात आतापर्यंत सुमारे ७० रुग्ण दाखल झाले. पैकी ९५ टक्के बरे होऊन गेले, तर काही रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या या रुग्णालयात दोन-तीन रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा: चाळीसगावला पून्हा पूराचे संकट..ढगफुटी सदृष्य पाऊस


कोरोनाव्यतिरिक्त रुग्णांनाही धोका
‘म्युकरमायकोसिस’ संसर्गाचा धोका कोरोनाबाधितांनाच असतो असे नाही. तर ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे, ज्यांना मधुमेहाचा खूप जास्त त्रास आहे अथवा अन्य काही व्याधी आहेत, त्यांनाही ‘म्युकर’ होऊ शकतो. कोरोनाबाधित रुग्णांना त्याचा धोका अधिक असतो, कारण कोरोना झाल्यानंतर होणाऱ्या उपचारांमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते, त्यामुळेही ‘म्युकर’चा धोका वाढतो.


‘म्युकर’चा धोका अन्य रुग्णांनाही होऊ शकतो. त्यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवले पाहिजे. शिवाय, रोगप्रतिकारशक्तीही चांगली असायला हवी,
-डॉ. अनुश्री अग्रवाल,
कान-नाक-घसातज्ज्ञ,
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय

loading image
go to top