अबब... जिल्ह्यात विक्रमी 254  कोरोना बाधित; जळगावने गाठला साडेनऊशेचा टप्पा !

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 5 July 2020

जिल्ह्यात आज 254 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले असले तरी दिवसभरात एकूण 135 जण बरे होवून घरी परतले आहेत. मात्र कोरोनामुळे अधिक त्रास होवून रोज मृत होणाऱ्यांचा आकडा वाढत आहे.

जळगाव  ः जिल्ह्यात आज कोरोना बाधितांच्या आकड्याचा विक्रमी विस्फोट झाला. दिवसभरात एकूण 254 बाधित आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या ही 4 हजार 430 वर पोहचली आहे. 

कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या आकड्यामुळे जळगाव जिल्हाच हॉटस्पॉट झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सर्वात मोठा कोरोना बाधितांचा आकडा आज नोंदला गेला असून, दिवसभरात 254 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. दोन दिवसांपूर्वी 209 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर इतक्‍या मोठ्या प्रमाणात रूग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

दिवसभरात आठ जणांचा मृत्यू 
जिल्ह्यात आज 254 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले असले तरी दिवसभरात एकूण 135 जण बरे होवून घरी परतले आहेत. मात्र कोरोनामुळे अधिक त्रास होवून रोज मृत होणाऱ्यांचा आकडा वाढत आहे. कोरोना बाधितांमधून आज दिवसभरात आठ जणांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत एकूण 271 जणांचा मृत्यू झाला आहे. 

जळगावची हजाराकडे वाटचाल 
जिल्ह्यातील एकूण बाधितांचा विचार केल्यास जळगाव शहर हे हॉटस्पॉट ठरत आहे. जळगाव शहरात मार्केट परिसर, बाजार, भाजी बाजारात गर्दी करणाऱ्यांमुळे शहरातील आकडा झपाट्याने वाढत आहे. आज शहरातील विविध भागांमधून 64 जणांचे अहवाल पॉण्टिव्ह आले आहेत. आजच्या आकड्यामुळे केवळ जळगाव शहरातील बाधितांची संख्या ही 958 वर पोहचली आहे. शहरात आज 64 बाधित आढळून आले असले तरी 67 जण बरे होवून घरी गेल्याचे दिलासादायक चित्र देखील पाहण्यास मिळत आहे. 

असे आढळले रूग्ण 
जळगाव शहर 64, जळगाव ग्रामीण 3, भुसावळ 8, अमळनेर 15, चोपडा 23, पाचोरा 4, धरणगाव 6, यावल 25, एरंडोल 13, जामनेर 2, रावेर 22, पारोळा 3, चाळीसगाव 19, मुक्‍ताईनगर 21, बोदवड 24, अन्य जिल्ह्यातील जळगावात आलेले 2 

जळगाव शहरातील या भागात प्रभाव 
आज आढळून आलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहरात शिवाजीनगरला 14, गणपतीनगर 7, सिंधीकॉलनी 4, शनिपेठ 4, आदर्शनगर, हौसिंग सोसायटी, रामेश्‍वर कॉलनी, श्री गजानन हार्ट हॉस्पिटल याठिकाणी प्रत्येकी 3, सम्राट कॉलनी, कांचननगर या भागात प्रत्येकी 2 रुग्ण आढळले. तर रवीराज कॉलनी, नूतन वर्षा कॉलनी, सिद्धीविनायक नगर, निमखेडी शिवार, पार्वतीनगर, मयूर कॉलनी, आझादनगर, ओंकारनगर, पारीख पार्क, भोईटेनगर, सुप्रीम कॉलनी, शाहूनगर, वाल्मीकनगर या भागात प्रत्येकी 1 व अन्य भागात 7 रुग्ण आढळून आले. जळगाव शहरात आज आढळून आलेल्या (64) बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची (67) संख्या जास्त होती. 

टपाल कार्यालयातील अधिकारी बाधित 
अमळनेर : येथील टपाल कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी आज "कोरोना' पॉझिटिव्ह आढळून आला. या पार्श्वभूमीवर खबरदारीचे उपाय म्हणून कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे "स्वॅब' तपासणी केली जाणार असल्यामुळे सोमवारपासून (ता. 6) तीन दिवस कार्यालय बंद राहणार आहे, असे प्रभारी पोस्ट मास्तर रमेश पवार यांनी सांगितले. अमळनेर शहरासह तालुक्‍यात 14 "कोरोना'बाधित आढळले आहेत. यात संपर्कातील 9 रुग्ण तर नवीन 5 रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या 395 वर पोहोचली आहे. 

चाळीसगाव "हॉटस्पॉट'च्या दिशेने 
चाळीसगाव : तालुक्‍यात एकाच दिवशी 19 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. शहरातील घाट रोड परिसरातील बाराभाई मोहल्ला येथील 10, देवीगल्लीत दोन, तर हनुमानवाडी, अहिल्यादेवीनगर, पाटीलवाडा व भीमनगर या भागांत प्रत्येकी एक असे 16 तसेच भवाळी, दस्केबर्डी व तांबोळे गावात प्रत्येकी एक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. 

वृद्ध महिलांची "कोरोना'वर मात 
एरंडोल : उच्च रक्तदाब व मधुमेहासारखे आजार असलेल्या 80 वर्षीय व 73 वर्षीय वृद्ध महिलांसह अन्य पंधरा महिलांनी "कोरोना'वर मात केली. शहरातील तेरा तर पिंपळकोठा येथील दोन रुग्णांनी काल कोरोनावर मात केली. शहरातील ग्रामीण रुग्णालय परिसरातील 82 वर्षीय व भगवा चौक येथील 73 वर्षीय वृद्ध महिलांनी उच्च रक्तदाब व मधुमेह असून, देखील कोरोनावर मात केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. आज सकाळी प्राप्त अहवालात माळीवाडा परिसरातील 32 वर्षीय महिला व 25 वर्षीय युवक, जहांगीरपुरा परिसरातील चार महिला व पंधरा वर्षीय युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. कुंभारटेक धनगरवाडा परिसरातील 66 वर्षीय महिला व फरकांडे येथील सत्तर वर्षीय महिलेचा देखील अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे तालुक्‍यातील रुग्णसंख्या 230 वर पोहोचली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon district today corona 254 case positive