esakal | ‘धनलक्ष्मी’ पावली..दिवाळीपर्वात कोट्यवधींची उलाढाल; दोन हजार गाड्यांची विक्री
sakal

बोलून बातमी शोधा

diwali market after corona

महिन्यांपासून खरेदीची इच्छा असलेल्यांनी दिवाळीच्या पर्वात भरगच्च खरेदी केली. सोने, चांदी, मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वस्तू, दुचाकी, चारचाकी वाहने, कपडे आदींना प्रचंड मागणी होती.

‘धनलक्ष्मी’ पावली..दिवाळीपर्वात कोट्यवधींची उलाढाल; दोन हजार गाड्यांची विक्री

sakal_logo
By
देविदास वाणी

जळगाव : दिवाळीच्या पर्वात अर्थात, कोरोनोच्या पहिल्या लाटेनंतर एक वेगळेच जग पाहावयास मिळाले. लॉकडाउनचे चार ते पाच महिने, नंतर चार महिने अनलॉकच्या प्रक्रियेत यामुळे नागरिक घरीच होते. अनेक महिन्यांपासून खरेदीची इच्छा असलेल्यांनी दिवाळीच्या पर्वात भरगच्च खरेदी केली. सोने, चांदी, मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वस्तू, दुचाकी, चारचाकी वाहने, कपडे आदींना प्रचंड मागणी होती. जळगावच्या बाजारपेठेत या सर्व वस्तूंच्या विक्रीतून अंदाजे शंभर कोटींची उलाढाल झाली आहे. 
दिवाळीपूर्वी दोन महिने आधी बाजारपेठा खुल्या झाल्या. कोरोना होऊ नये म्हणून सामाजिक अंतर पाळत, मास्क लावत खरेदीस प्राधान्य देण्यात आले. मात्र दिवाळीच्या अगोदरपासून ते आजपर्यंत बाजारात सामाजिक अंतराचा फज्जा उडवत नागरिकांनी विविध साहित्यांच्या खरेदीसाठी तोबा गर्दी केली. 

दिवाळीच्या पर्वात तयार फराळासह मिठाईला मागणी होती. सुमारे दोन ते तीन कोटींची उलाढाल या व्यवसायात झाली. दिवाळीत धनत्रयोदशी व लक्ष्मीपूजनाला नागरिकांनी सोने-चांदीच्या दागिन्यांची मोठी खरेदी केली. सोबतच पूजनासाठी लागणाऱ्या सोन्याच्या लहान मूर्तीला मागणी होती, अशी माहिती महावीर ज्वेलर्सचे संचालक अजय ललवाणी यांनी दिली. 

दोन हजार दुचाकींची विक्री 
दिवाळीत नवीन वाहन खरेदीचा आनंद काही औरच असतो. शहरासह जिल्ह्यात सुमारे दोन हजार दुचाकींची विक्री झाली. दुचाकीच्या एका शोरूममधून जवळपास सुमारे पाचशे दुचाकींची विक्री झाल्याची माहिती संचालक योगेश चौधरी यांनी दिली. दुचाकी विक्रीतून एक कोटी २० लाखांची उलाढाल झाली. चारचाकी वाहनांचे ज्यांनी काही महिन्यांपूर्वी बुकिंग केले होते, अशा पाचशे नागरिकांना वाहने दिवाळीत मिळाली. चारचाकी वाहनांच्या विक्रीतून साडेतीन कोटींची उलाढाल झाली. अनेकांना बुकिंग करूनही चारचाकी मिळाल्या नाहीत. सोबतच नवीन मोबाईल, टीव्ही, फ्रीज, घरगुती इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपडे, इतर वस्तूंच्या विक्रीतून मोठी उलाढाल झाली आहे. 

सुवर्णबाजाराची चांदी’ 
कोरोना काळाने सर्वच क्षेत्रांना व बाजारपेठेस धक्का बसला होता. अनलॉकनंतर बाजारपेठेत तेजी येईल, अशी अपेक्षा होती. नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी असे पाठोपाठ उत्सव असल्याने बाजार ‘बूम’ करेल, असे वाटत होते. दसऱ्याला फार प्रतिसाद नव्हता. पण, दिवाळीला धनत्रयोदशीपासून सुवर्णबाजारात तेजी आढळून आली. धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजनाला सुवर्णबाजारात जवळपास शंभर कोटींची उलाढाल झाल्याचे सांगितले जात आहे.  

संपादन ः राजेश सोनवणे