लक्ष्मीपूजनाने दीपावलीचा आनंदोत्सव; फटाक्‍यांची आतषबाजी 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 14 November 2020

दुकानांमध्ये जमा खर्चाच्या वह्यांचे पूजन झाले. नंतर फटाके फोडण्यात आले. सर्वांनीच आज नवीन कपडे घालून लक्ष्मीचे पूजन केले. 

जळगाव : शहरासह जिल्ह्यात आज लक्ष्मीपूजन करून दिपावलीचा मंगलमय दिवस आज घरोघरी, दुकानांत साजरा झाला. लक्ष्मीचे विधिवत पूजन करून वेदांच्या जयघोषीत माता लक्ष्मीला आळवणी करून वर्षभर तुझे (लक्ष्मीचे) वास्तव आमच्याकडे राहू दे, अशी विनंती करण्यात आली. दुकानांमध्ये जमा खर्चाच्या वह्यांचे पूजन झाले. नंतर फटाके फोडण्यात आले. सर्वांनीच आज नवीन कपडे घालून लक्ष्मीचे पूजन केले. 

पूर्वी दिवाळीच्या शुभेच्छांची ग्रीटींगला अधिक मागणी असायची. आपले आप्त, स्नेही, समव्यावसायीक, मित्र, मैत्रीण, उद्योजक आदी एकमेकांना शुभेच्छा पत्रे देऊन दिवाळीच्या शुभेच्छा देत असत. वाटसअप, फेसबूक, टिव्टर, इन्स्टाग्राम आल्यापासून दिवाळीच्या शुभेच्छा या सोशल माध्यमावर दिल्या जातात. आजही दिवाळीच्या शुभेच्छा अशाच पद्धतीने दिल्या गेल्या. तर अनेकांनी शुभेच्छा पत्राचाही वापर केला. आपल्या जवळच्या नातेवाईकांना फोन करून आवजून शुभेच्छा दिल्या गेल्या. 

फटाक्‍यांचा आनंद कायम
सायंकाळी सहापासून लक्ष्मी पूजन असल्याने सायंकाळनंतर सर्वच ठिकाणी पूजा सुरू असल्याचे पहावयास मिळाले. नवीन कपडे घालून फटाके फोडत दिवाळीचा आनंद लुटण्यात आला. यंदा फटाके कोरोनाच्या भितीमुळे कमी प्रमाणात फोडले गेले. जळगाव शहरात रात्री आठ ते दहा या वेळेतच फटाके फोडण्यास परवानगी दिली असली काही ठिकाणी अगोदर पासूनच फटाके फोडण्यात आले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon diwali utsav crackers fire night