
जळगावचे ग्रामदैवत असलेल्या जुन्या जळगावातील श्रीराम मंदिर संस्थानच्या श्रीराम रथोत्सवाला सुमारे दीडशे वर्षांची परंपरा आहे. मात्र, या उत्सवाची परंपरा यंदा कोरोनामुळे खंडित होणार आहे.
जळगाव : दीडशे वर्षांची परंपरा लाभलेल्या श्रीराम रथोत्सवाला यंदा कोरोनामुळे मोठी ‘मोगरी’ लागली आहे. यंदा रथाच्या ग्रामप्रदक्षिणेला जिल्हा प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परवानगी नाकारली आहे. मात्र, रथाचे विधिवत पूजन होऊन पाच पाऊल रथ ओढला जाईल. भक्तांना रथाचे फेसबुकद्वारे लाइव्ह दर्शन घडविले जाणार आहे.
आवश्य वाचा- राज्यपालांनी खडसेंना दिल्या यशाच्या सदिच्छा -
जळगावचे ग्रामदैवत असलेल्या जुन्या जळगावातील श्रीराम मंदिर संस्थानच्या श्रीराम रथोत्सवाला सुमारे दीडशे वर्षांची परंपरा आहे. मात्र, या उत्सवाची परंपरा यंदा कोरोनामुळे खंडित होणार आहे. दर वर्षी कार्तिकी (प्रबोधिनी) एकादशीला रथ निघतो व त्याच्या निश्चित केलेल्या मार्गावरून लाखो भाविकांच्या साक्षीने हा उत्सव साजरा होतो.
उत्सवाला परवानगी नाही
यंदा मात्र रथोत्सव समितीने उत्सवासाठी परवानगी मागितली असता, जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनामुळे ती नाकारली आहे. रथ श्रीराम मंदिर संस्थानपर्यंत तरी आणू द्यावा, अशी विनंतीही नाकारण्यात आली आहे. त्यामुळे यंदा रथाचे पूजन रथघराजवळच होईल. तेथून पाच पावले रथ ओढण्यात येईल. अवघ्या काही मिनिटांत हा विधिवत कार्यक्रम पार पडेल. त्यासाठी रथघराच्या सभोवतालचे सर्व रस्ते गर्दी होऊ नये म्हणून बॅरिकेडिंगने बंद करण्यात येणार आहेत. रथाचे फेसबुक लाइव्ह व स्थानिक केबल चॅनलवरून प्रक्षेपण करण्यात येईल.
रथाची साफसफाई
गुरुवारी (ता. २६) रथोत्सव असल्याने त्यासाठी रथ बाहेर काढण्यात आला. महापालिकेच्या बंबाच्या सहाय्याने त्याला धुण्यात आले आणि रंगरंगोटी, तसेच रथावरील कलश तयार करण्यात आला. गुरुवारी सकाळी दर वर्षीप्रमाणे झेंडूच्या माळा व आकर्षक रोषणाईने रथ सजविला जाणार आहे.
हेही वाचा- बांधकाम क्षेत्राला संजीवनी देणारा निर्णय
एकादशीचा उपवास गुरुवारीच
यंदा एकादशीची तिथी बुधवार व गुरुवार असे दोन्ही दिवस कॅलेंडरमध्ये दर्शविण्यात आली आहे. काही कॅलेंडरमध्ये रथोत्सवही बुधवारी (ता. २५) दर्शविण्यात आला असला, तरी हिंदू पंचांगानुसार सूर्योदयाला जी तिथी असते तीच तिथी मानली जाते म्हणून गुरुवारच्या सूर्योदयाला एकादशी असल्याने रथोत्सव गुरुवारीच (ता.२६) आहे आणि एकादशीचा उपवासही गुरुवारीच करावा, अशी माहिती श्रीराम मंदिर संस्थानचे गादीपती पू. मंगेश महाराज जोशी यांनी बोलताना दिली.
संपादन- भूषण श्रीखंडे