खोदकाम करताना सापडले सोने; कमी दरात देतोय..घेवून टाका

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 25 October 2020

खोदकाम करतांना जवळपास एक किलो सोन्याचे दागिने सापडले असुन त्या दागिन्यांचे सोन्याचे मणी केले आहेत. आम्ही हे सोन्याचे दागिने अत्यंत कमी भावात विकुन टाकणार आहोत,

यावल (जळगाव) : येथील विरारनगरातील एका सेवानिवृत्त प्राध्यापकाची भामट्यांनी सोन्याचे नकली मणी, दागिने देऊन सात लाख रुपयांमध्ये फसवणुक केल्याची घटना घडली आहे. ऐन सोन लुटण्याच्या विजयादशमीला निवृत्त प्राध्यापकाची भामट्यांनी नकली दागिने देऊन सात लाख रुपयात फसवणुक प्रकाराची शहरात सर्वत्र एकच चर्चा होत असुन, पोलीसांनी या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची सुरु आहे. नागरिकांनी अशा भामट्यांपासुन सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. 

शहरातील विस्तारित वसाहतीमधील विरारनगर परिसरात राहणारे सेवानिवृत्त प्रा. एस. डी. पाटील यांच्याकडे शनिवारी (ता.24)दोन अज्ञात भामटे आले. आम्ही राजस्थान येथील राहणारे असुन आम्हास एका ठिकाणी खोदकाम करतांना जवळपास एक किलो सोन्याचे दागिने सापडले असुन त्या दागिन्यांचे सोन्याचे मणी केले आहेत. आम्ही हे सोन्याचे दागिने अत्यंत कमी भावात विकुन टाकणार आहोत, असे सांगुन पाटील कुटुंबांना विश्वासात घेत बाजारात जवळपास ६० लाख रुपये किमतीचे दागिने फक्त सात लाखात मिळत आहे. या आमिषाला बळी पडत त्यांनी या भामट्यांच्या भुलथापांना बळी पडुन हे दागिने खरीदी केल्याची घटना घडली.

सुशिक्षीत परिवार फसला
एका अत्यंत सुशिक्षित कुटुंबाच्या अशा प्रकारे दोन भामट्यांकडुन सोन्याच्या आमिषाला बळी पडून झालेल्या फसवणुकीमुळे वसाहतीमधील नागरिकांमध्ये असुरक्षेते वातावरण निर्माण झाले आहे. पोलिस निरिक्षक अरूण धनवडे यांनी अशा प्रकारे आमीष दाखवून फसगत करणाऱ्या भामट्यांकडून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. या घटनेबाबत यावल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon duplicate jwellary and sevan lakh frauding