esakal | दसरा, दिवाळी कॅश करण्यासाठी डिस्काउंटचा भडिमार 
sakal

बोलून बातमी शोधा

दसरा, दिवाळी कॅश करण्यासाठी डिस्काउंटचा भडिमार 

आगामी काळ सणासुदीचा आहे. ग्राहक योजनांशिवाय येत नाही हे व्यापाऱ्यांनी जाणले आहे. यामुळे काहींनी आतापासूनच ग्राहकांना विविध योजनांद्वारे सूट देणे सुरू केले आहे,

दसरा, दिवाळी कॅश करण्यासाठी डिस्काउंटचा भडिमार 

sakal_logo
By
देविदास वाणी

जळगाव ः कोरोना संसर्ग टाळण्यासाठी शासनाने तीन महिन्यांचा लॉकडाउन जाहीर केला होता. त्यानंतर अनलॉकची प्रक्रिया हळूहळू सुरू केलीय. व्यापार, उद्योगांसह सर्वच क्षेत्रांवर कोरोनाचे सावट होते व आहे. अनेकांना कोरोनामुळे नोकरी, रोजगार गमवावा लागला. असे असले तरी अनलॉकच्या चौथ्या टप्प्यानंतर व्यापार पूर्वपदावर येण्यास सुरवात झाली आहे. आगामी काळातील दसरा, दिवाळी कॅश करण्यासाठी विविध क्षेत्रांतून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सवलतीच्या योजना व्यापाऱ्यांनी सुरू केल्या आहेत. यामुळे व्यापारात वृद्धी होण्याची आशा आहे. 

सध्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बाजारात विविध नियमांसह बाजारपेठा सुरू आहेत. गर्दी न करता बाजारपेठेत व्यापार होत आहे. सामाजिक अंतर पाळणे, सॅनिटायझर लावणे आदी बाबी पाळल्या जात आहेत. मात्र अजूनही व्यापाऱ्यांकडील मालाची हवी तशी विक्री होत नाही. आगामी काळ सणासुदीचा आहे. ग्राहक योजनांशिवाय येत नाही हे व्यापाऱ्यांनी जाणले आहे. यामुळे काहींनी आतापासूनच ग्राहकांना विविध योजनांद्वारे सूट देणे सुरू केले आहे, तर काही आगामी काळात योजना आणणार आहेत. 

ऑटोमोबाईल क्षेत्रात चारचाकी वाहनांना चांगली मागणी आहे. ग्राहकांना वाहन डिलिव्हरीसाठी सहा-सहा महिने वेटिंग करावे लागते अशी स्थिती आहे. विविध कंपन्यांकडून वाहन खरेदी करताना किमतीवर ७५ हजार ते एक लाखापर्यंत सूट दिली जात आहे. सोबतच ‘ईएमआय’वरही वाहने उपलब्ध आहेत. आगामी काळात अजून वाहनांना मागणी वाढणार आहे. 
-यझदी पाजनीगारा, संचालक, फोकस हुंडाई 

योजनेची तयारी सुरू 
अजून बाजारपेठेत दसरा, दिवाळी खरेदीचा उत्साह नाही. घटस्थापनेपासून तो होईल. त्यासाठी योजना कोणत्या राबवाव्यात याबाबत तयारी सुरू आहे. त्या काळात ग्राहकांसाठी नक्कीच विविध योजना देऊन खरेदीस प्रोत्साहित करू. गृहिणी, सर्वसामान्य नागरिक डोळ्यासमोर ठेवून योजना राबवू. 
-अनिल कांकरिया, संचालक, प्लस नवजीवन 

परवडेल अशा दरात कपडे 
लॉकडाउनमुळे अनेकांचा रोजगार गेला. नोकऱ्याही गेल्या. यामुळे ग्राहकांना परवडेल अशा दरात, शोरूमपेक्षा कमी किमतीत आम्ही कपडे विकतो. ग्राहकांना कमी दरात कपडे हाच आमचा नफा अशी पद्धत सध्या अवलंबिली आहे. 
-रमेश मतानी, संचालक रमेश गारमेंट्स 

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image