esakal | खानदेशी भरीताची चवच न्यारी..चला मग भरीत खायला 
sakal

बोलून बातमी शोधा

eggplant bharit

खानदेशी भरीत म्हटल्यावर खवय्यांच्या जिभेला पाणी सुटायलाच हवे. हे भरीत भाकरी, पुरी, चपाती कशाही बरोबर अप्रतिम लागते. वांग्याचं भरीत हॉटेलातल्या मेनूलिस्टमध्ये हवं, असं दहा वर्षांपूर्वी कुणी म्हटलं असतं तर तो विनोद ठरला असता! आता परिस्थिती निराळी आहे. 

खानदेशी भरीताची चवच न्यारी..चला मग भरीत खायला 

sakal_logo
By
राजेश सोनवणे

जळगाव : जळगाव म्‍हटले म्‍हणजे खानदेशी भरीत आणि कडण्याची भाकरी हा मेनू हमखास आठवतो. त्‍यात हिवाळा आला की त्‍याची चवच न्यारी असते. आता तर भरिताची ही नवी कीर्ती सर्वदूर पसरली...पूर्वी भरिताचा सीझन असे. म्हणजे भरिताची मजा हिवाळ्यातच मानली जाते. वर्षातला ठराविक काळ खास भरिताच्या नावावर होता. आता रोजच म्‍हणजे बाराही महिने भरिताचे झाले आहे. जळगावातच सुरू झालेल्या "क्रिष्णा' भरीत सेंटरने या कीर्तीत कळस गाठला. खरेदीसाठी रांगा लागतात. भरिताला हे असे भरते आले! जळगावमध्ये आजमितीस पन्नासच्या जवळपास भरीत सेंटर्स आहेत. अनेक हॉटेलांतून आणि बार-कम-रेस्टॉरंटमधून देखील भरीतचा स्‍पेशल मेनू पाहण्यास  

लग्‍नातही आला भरिताचा स्‍वाद 
वांग्याची भाजी हा खानदेशातील विशेष म्‍हणजे जळगाव जिल्ह्यातील विवाह समारंभातील मेनू. इतकेच नाही तर वांग्याचं भरीत लग्नातून जेवणावळीत नसते, पण "बुफे डिनर' असेल तर भरीत आणि पुरी हमखास पाहण्यास मिळते. वांग्याच्या भाजीला तितकीशी नसली, तरी भरिताला प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. भरीत सगळेच आवडीने खात म्‍हणूनच तर भरित पार्टीचे आयोजन हिवाळ्याच्या दिवसात केले जाते. 

तावडी पट्टीत स्‍पेशल
जळगाव जिल्ह्याची भाषिकदृष्ट्या दोन भागांत विभागणी होते. एक अहिराणी पट्टी आणि दुसरी तावडी पट्टी. तावडी पट्टीत लेवा पाटीदार समाजबांधवांची संख्या अधिक. तावडी बोलीही मुख्यत्वे लेवा पाटीदार! तावडी पट्टीतले तालुके जळगाव, रावेर, यावल आणि भुसावळ. वांग्याचं भरीत अस्सल शिजते ते तावडी पट्टीतच. काटे पेटवले जातात... आणि काट्यांमध्ये भाजली जातात भल्यामोठ्या आकाराची "बामणोदी' वांगी. 

असे करा भरीत
भाजलेल्या वांग्याची साल काढून गर बाजूला ठेवावा. लसूण आणि हिरव्या मिरच्या खलबत्त्यात बारीक झाल्यावर त्यात वांग्याचा गर घालून एकजीव करावा. कढईमध्ये तेल तापायला ठेवून त्यात जिरे, मोहरी, हिंगाची फोडणी द्यावी. त्यात शेंगदाणे आणि खोबरे घालून परतावे. खोबरे सोनेरी रंगावर भाजले गेले, की त्यात कांद्याची पात घालून परतावे. नंतर त्यावर वांग्याचा गर, मीठ टाकून पुन्हा परतावे, वरून कोथिंबीर घालून पुन्हा परतावे. 

साहित्य 
- मोठे भाजलेले वांगे 
- लसूण पाकळ्या 
- हिरव्या मिरच्या 
- एक वाटी चिरलेली कांद्याची पात 
- एक वाटी चिरलेली कोथिंबीर 
- मीठ चवीप्रमाणे 
- मूठभर कच्चे शेंगदाणे 
- सुक्‍या खोबऱ्याचे काप (मूठभर) 
- फोडणीसाठी तेल 
 

loading image
go to top