माजीमंत्री खडसे पक्षांतर करतीलच; गुलाबराव पाटील यांचे सूचक विधान 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 11 October 2020

एकनाथराव खडसे यांच्या पक्षांतराबाबत व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेनंतर खडसे राष्ट्रवादीत जाणार की शिवसेनेत जाणार? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

जळगाव : 'सध्या एकनाथ खडसे कोणाच्या संपर्कात आहेत, याची वस्तुस्थिती मला माहिती नाही. पण ते पक्षांतर करतील हे सत्य आहे', असे सूचक विधान शिवसेनेचे प्रवक्ते, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज येथे केले. 

माजीमंत्री एकनाथराव खडसे यांच्या पक्षांतराची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री पाटील यांनी खडसेंच्या पक्षांतराचे संकेत देणारी प्रतिक्रिया पत्रकारांना दिली. आज दुपारी अजिंठा शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री पाटील आले होते. त्यावेळी ते बोलत होते. 
मंत्री पाटील यांनी एकनाथराव खडसे यांच्या पक्षांतराबाबत व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेनंतर खडसे राष्ट्रवादीत जाणार की शिवसेनेत जाणार? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. कारण मुंबईत खडसेंची राष्ट्रवादी प्रवेशाबाबत शरद पवारांसोबत भेट होणार असल्याचे सांगितले जात होते. परंतु, मुंबईत चार दिवस थांबून असताना श्री. खडसे, श्री. पवार यांच्यात कोणत्याही प्रकारची भेट झाली नाही. 

यावेळपासून आहे चर्चा
मध्यंतरी खडसेंनी शिवसेनेत यावे, असा आग्रह शिवसेनेच्या नेत्यांकडून घातला जात होता. त्यात मंत्री अब्दुल सत्तार, शिवसेनेचे उदय सामंत, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी खडसेंना शिवसेना प्रवेशाचे आमंत्रण दिले होते. मात्र, खडसेंनी याबाबत कोणतेही मत मांडले नव्हते. त्यानंतर शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या जळगावातील नेत्यांना मुंबईत बोलावून घेत त्यांच्यासोबत बैठक घेऊन खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत चाचपणी केली होती. तेव्हापासून खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा सुरू आहे. 

म्‍हणूनच रंगू लागली पुन्हा चर्चा
मुंबई दौरा केल्यानंतर त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशासंदर्भात काही हालचाली झाल्या नाहीत. या साऱ्या घडामोडी पाहता राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा रंगवून खडसे मागच्या दाराने शिवसेनेत तर जाणार नाहीत ना? अशीही चर्चा आता रंगू लागली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज गुलाबराव पाटील यांनी दिलेली सूचक प्रतिक्रिया खडसेंच्या शिवसेना प्रवेशाकडे निर्देश करत आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon eknath khadse defection final gulabrao patil statement