एकनाथ खडसें मुंबईकडे हेलिकाॅप्टरने रवाना !

दिपक चौधरी
Thursday, 22 October 2020

खडसेंसोबत कोण कोण मुंबईत जाणार याबाबत खूप उत्सुकता होती. अखेर ते सहकुटुंब मुंबईला रवाना झाले. खडसे मुंबईला जात असताना त्यांना निरोप देण्यासाठी त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुक्ताईनगर ः राष्ट्रवादी प्रवेशासाठी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे आज दुपारी 2 वाजून 25 मिनिटांनी सहकुटुंब मुंबईला विशेष चार्टर्ड हेलिकॉप्टरने रवाना झाले. मुक्ताई साखर कारखान्याच्या हेलिपॅडवरून त्यांनी मुंबईच्या दिशेने उड्डाण केले. खडसेंसोबत त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे, कन्या ऍड. रोहिणी खडसे तसेच केअर टेकर गोपाळ चौधरी हे देखील हेलिकॉप्टरमध्ये आहेत.

आवश्य वाचा- फडणवीसांनी तिकीट वाटपात गोंधळ केल्यामूळेच भाजपची सत्ता गेली- खडसे 

एकनाथ खडसे यांनी बुधवारी दुपारी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर काही वेळेतच मुंबईत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खडसे हे शुक्रवारी दुपारी दोन वाजता मुंबईत शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीतप्रवेश करणार असल्याची घोषणा केली होती. या साऱ्या घडामोडींनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे.

एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची निश्चितता झाल्यानंतर त्यांच्या आजच्या मुंबई दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. खडसेंसोबत कोण कोण मुंबईत जाणार याबाबत खूप उत्सुकता होती. अखेर ते सहकुटुंब मुंबईला रवाना झाले. खडसे मुंबईला जात असताना त्यांना निरोप देण्यासाठी त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने मुक्ताई साखर कारखान्याच्या आवारात आलेले होते.

 

समर्थक देखील मुंबईला जाणार

एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश सोहळा उद्या मुंबई येथे होणार आहे. त्यासाठी खडसे समर्थक मोठ्या प्रमाणात मुंबईला निघणार आहे  अशी माहिती मिळाली आहे.   

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Eknath Khadse left for Mumbai by helicopter to join the NCP