खडसेंच्या निकटचा आमदार देणार भाजपाचा राजीनामा; पुन्हा देवून निवडणूक लढणार 

कैलास शिंदे
Thursday, 17 December 2020

भाजपचे आमदार फोडण्याचे ‘स्ट्रॅटेजी’ आपणास खडसे यांनी सांगितल्याचेही पवार यांनी जाहीरपणे सांगितले आहे. त्यामुळे भाजपतून आमदार बाहेर पडण्याच्या ‘महाविकास आघाडी’तील नवीन राजकीय वळणाची आता चर्चा सुरू झाली आहे. 

जळगाव : भाजप आमदाराने राजीनामा देऊन राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून त्यांना परत निवडून आणण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. याची ‘लिटमस टेस्ट’ एकनाथराव खडसे यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्ह्यातील भुसावळ विधानसभा मतदारसंघातून घेण्याची शक्यताही आता व्यक्त होत आहे. 
भाजपचे अनेक आमदार राजीनामा देऊन राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये येण्यास तयार आहेत. त्यांना राष्ट्रवादीतर्फे पुन्हा निवडून आणू, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलताना दिली. तसेच भाजपचे आमदार फोडण्याचे ‘स्ट्रॅटेजी’ आपणास खडसे यांनी सांगितल्याचेही पवार यांनी जाहीरपणे सांगितले आहे. त्यामुळे भाजपतून आमदार बाहेर पडण्याच्या ‘महाविकास आघाडी’तील नवीन राजकीय वळणाची आता चर्चा सुरू झाली आहे. 

भाजपची त्यावेळची ‘मेगाभरती’ 
विधानसभा निवडणुकीच्या काळात भाजपने ‘मेगाभरती’दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रसचे अनेक आमदार फोडले आहेत. त्यातीही काही जण पराभूत झाले तर काही निवडून आले आहेत. परंतु, विधानसभा निकालानंतर राज्यात सत्तांतर शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेस अशा तीन पक्षांची सत्ता महाराष्ट्रात आली. सत्ता स्थापनेच्या वेळी हे सरकार फार दिवस टिकणार नाही अशी चर्चा होती. परंतु आता एक वर्षे पूर्ण झाल्यामुळे विरोधी पक्ष भाजपच्या आमदारांत चलबिचल सुरू झाल्याची चर्चा आहे. 

माजी आमदार आघाडीकडे 
राज्यात सत्ता स्थापन झाल्यानंतर भाजपचे काही माजी आमदार महाविकास आघाडीच्या पक्षात सामील झाले आहेत. त्यात काही कॉंग्रेस, तर काही शिवसेनेत गेले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येही मोठ्या प्रमाणात ‘इनकमिंग’ करण्यात आले आहे. माजी मंत्री एकनाथराव खडसे, बीड येथील माजी आमदार व ज्येष्ठ नेते जयसिंगराव गायकवाड यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यातच आता कोल्हापूर येथील राजू आवले यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. 

भाजपचा फॉर्म्युला ‘फेल’ 
राज्यात आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर सरकार पाडण्यासाठी भाजप कर्नाटक व मध्यप्रदेश फॉर्म्युला वापणार अशी चर्चा सुरू होती. यात तीन पक्षातील आमदार फोडून त्यांना राजीनामा द्यायला लावून त्यांना पुन्हा निवडून आणण्यात येणार होते. परंतु, आज वर्षभरानंतरही त्यांचा हा फार्म्युला राज्यात सक्सेस झाला नाही. 

महाविकास आघाडीचे ‘तंत्र’ 
आता महाविकास आघाडीतर्फे हेच तंत्र वापरण्यात येणार असल्याची चर्चा सुरू झाली असून आता भाजपचेच आमदार फोडून त्यांना महाविकास आघाडीच्या पक्षात प्रवेश देऊन त्यांना निवडणुकीत निवडून आणण्यात येणार आहे. पोटनिवडणूक झाल्यास त्या मतदारसंघात महाविकास आघाडीतर्फे एकच उमेदवार देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही याच फार्मुल्याची जाहीरपणे घोषणा केली. काही जण स्वगृही येण्यास तयार आहेत, त्यांना पक्षात घेवून पुन्हा निवडणुकीत निवडून आणण्यात येईल असेही त्यांनी सांगितले, विशेष म्हणजे आमदार फोडण्याचा हा फार्म्युला एकनाथराव खडसे यांनी सांगितल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. 

‘लिटमस टेस्ट’ भुसावळात? 
या फॉर्म्युल्याची ‘लिटमस टेस्ट’ एकनाथराव खडसे यांच्या जिल्ह्यातील भुसावळ विधानसभा मतदारसंघात करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. भुसावळात विद्यमान आमदार संजय सावकारे भाजपचे आहेत. मात्र ते खडसे यांचे कट्टर समर्थक असून नुकताच त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला, प्रसिध्दी माध्यमात देण्यात आलेल्या जाहिरातीत केवळ एकनाथराव खडसे यांचाच फोटो होता. भाजपच्या एकाही नेत्याचा फोटो नसल्यामुळे ते राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे. 

.. तर सावकारेंचा राजीनामा 
सावकारेंना राष्ट्रवादीतून खडसे यांनी भाजपमध्ये आणले होते. त्यामुळे आमदारकीचा राजीनामा देऊन ते पुन्हा राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता आहे. तसेच पोटनिवडणुकीत त्यांना उमेदवारी देऊन निवडून आणले जाईल. त्यातून फॉर्म्युल्याची परीक्षा होईल, तसेच खडसे यांची जिल्ह्यातील राजकीय शक्तीही जोखली जाईल. महाष्ट्रासाठी ‘फार्म्युला’ ठरण्याची शक्यता असलेल्या जळगाव जिल्ह्यातील राजकीय उलथापालथीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असणार आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon eknath khadse near mla resine bjp