esakal | बीएचआर प्रकरणात बड्या व्यक्‍तीचे नाव : खडसे; गिरीश महाजनांच्या लेटरपॅडबद्दल खुलासा
sakal

बोलून बातमी शोधा

eknath khadse

बीएचआर प्रकरणात जमिनींचे गैरव्यवहार झाले आहेत. यात जामनेर, जळगाव आणि पुणे येथील जमिनींची अधिक प्रॉपर्टी असल्‍याचा खुलासा देखील खडसे यांनी केला. यात कोणाचा सहभाग आहे.

बीएचआर प्रकरणात बड्या व्यक्‍तीचे नाव : खडसे; गिरीश महाजनांच्या लेटरपॅडबद्दल खुलासा

sakal_logo
By
राजेश सोनवणे

जळगाव : बीएचआर गैरव्यवहार प्रकरणी २०१८ पासून पाठपुरावा करत आहे. केंद्र शासनाकडून याची चौकशी करण्याचे आदेश असताना देखील त्‍यावेळी प्रकरण दडपण्यात आले. मात्र आता यातील सर्व सत्‍य बाहेर येणार असून, या प्रकरणात बड्या नेत्‍याचे नाव असून ज्‍याचा संबंध मंत्र्यांशी राहिला असल्‍याचा गौप्यस्‍फोट एकनाथ खडसे यांनी आज पत्रकार परिषदेत केला. 
बीएचआर सहकारी बँकेतील घोटाळ्याप्रकरणी कारवाई सुरू असतांना आज माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. यावेळी सदर प्रकरणात पाठपुरावा करणाऱ्या ॲड. किर्ती पाटील देखील उपस्‍थित होत्‍या. 
खडसे यांनी सांगितले, की बीएचआरचा साधारण ११०० कोटी रूपयांचा घोटाळा आहे. याबाबत २०१८ मध्ये ॲड. किर्ती पाटील यांनी राधा मोहन यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. त्‍यावेळी त्‍यांनी राज्‍य शासनाला सदर प्रकरणाची चौकशी इओडब्‍ल्‍यू यांच्या मार्फत करण्याचे आदेश काढले होते. मात्र या प्रकरणाची चौकशीत पुण्यात राजकीय व्यक्‍तीकडून दबाव आणण्यात आल्‍याने तात्‍पुरती स्‍वरूपाची चौकशी झाल्‍याचे दाखवून प्रकरण दडपण्यात आले. इतकेच नाही, तर त्‍यावेळी विरोधी पक्षनेते असलेले धनंजय मुंडे यांनी देखील बीएचआरचे अवसायक असलेले कंडारे यांच्याकडे माहिती मागितली होती. मात्र त्‍यांनी दिली नाही. पण बीएचआरची प्रॉपर्टी कमी किंमतीत घेतल्‍याचे खडसे यांनी सांगितले.

लेटरपॅड बद्दल खुलासा
बीएचआर गैरव्यवहार प्रकरणी झालेल्‍या चौकशीदरम्‍यान सापडलेल्‍या कागदपत्रांमध्ये माजी मंत्री गिरीश महाजन यांचे लेटरपॅड आढळून आले आहे. याबद्दल बोलताना खडसे म्‍हणाले, की कोणाचे लेटरपॅड सापडले म्‍हणून त्‍याचा प्रकरणाशी संबंध येतो असे होत नाही. कारण कोणी चोरून देखील लेटर पॅड नेवू शकतो. 

जामनेरची प्रॉपर्टी अधिक
बीएचआर प्रकरणात जमिनींचे गैरव्यवहार झाले आहेत. यात जामनेर, जळगाव आणि पुणे येथील जमिनींची अधिक प्रॉपर्टी असल्‍याचा खुलासा देखील खडसे यांनी केला. यात कोणाचा सहभाग आहे. हे समोर येणार असून, सदर प्रकरणाचा पुर्ण चौकशी करण्याबाबत सरकारकडे पाठपुरावा करणार असून, ठेवीदारांना त्‍यांचा पैसा परत करण्याची मागणी देखील सरकारकडे करणार असल्‍याचे खडसे यांनी सांगितले.

स्‍पष्‍ट नाव घेण्याचे टाळले
सदर प्रकरणात बड्या नेत्‍याचे नाव असल्‍याचे खडसे यांनी यावेळी सांगितले. यात कोणाचा सहभाग आहे त्‍यांची नावे असून त्‍याबाबतची कागदपत्र असल्‍याचे देखील त्‍यांनी सांगितले. परंतु, स्‍पष्‍ट नाव घेण्याचे टाळत संबंधीताचे नाव पोलिसांकडूनच समोर येणार असल्‍याचे खडसे यांनी सांगितले.
 

loading image