esakal | अजित पवारांवर टिका करू शकत नाही : खडसेंनी डागली फडणविसांवर तोफ
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Khadse Devendra Fadnavis

कोणीही माझ्यावर आरेाप करायचे. चार, पाच दिवस टीव्हीवर ते चालवायचे, असे षडयंत्र होते. माझ्याविरुद्ध बोलण्यासाठी षडयंत्र कोणी रचले. कोण कोणाशी भेटले, कोणी फोन केले, याचे सर्व पुरावे माझ्याकडे आलेले आहेत, असे खडसे म्हणाले. 

अजित पवारांवर टिका करू शकत नाही : खडसेंनी डागली फडणविसांवर तोफ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टिका टिप्पणी करू शकत नाही. कारण आम्ही (देवेंद्र) सर्व तत्त्व, सत्व विसरून चार दिवसांचा संसार केला आहे. मुहूर्त साधला, लग्न केले, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तीन, चार दिवस एकत्र राहिलो. चार दिवस दुसऱ्याच्या घरात राहून तुम्ही पतिव्रता कसे राहू शकतात? टिका- टिप्पणी करू शकत नाही. कारण तुम्ही नैतिकता हरविली आहे, असा आरोप करीत माजीमंत्री एकनाथराव खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागली. त्यांनी ‘सकाळ’शी बोलताना हा आरोप केला. 

खडसे म्हणाले, की माझ्यावर नको ते आरोप करून मला मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला लावला. यामागे मोठे षडयंत्र आहे. माझ्यावर दाउद इब्राहिमबाबत नाहक आरोप केले गेले. हॅकर मनीष भंगाळेला देवेंद्रजी भेटले होते. याबाबत त्यांना विचारल्यावर तो भेटायला आला म्हणून भेटलो, असे उत्तर फडणवीस यांनी दिले. कोणीही माझ्यावर आरेाप करायचे. चार, पाच दिवस टीव्हीवर ते चालवायचे, असे षडयंत्र होते. माझ्याविरुद्ध बोलण्यासाठी षडयंत्र कोणी रचले. कोण कोणाशी भेटले, कोणी फोन केले, याचे सर्व पुरावे माझ्याकडे आलेले आहेत, असे खडसे म्हणाले. 

वरिष्ठांना दिले पुरावे 
माझ्याविरुद्ध बोलण्यासाठी कोणत्या मंत्र्यांचे पीए जात होते. दमानिया यांना कसे भेटायचे, याची व्हिडिओ क्लीपही माझ्याकडे आहे. याबाबत मी त्यावेळीही वरिष्ठांना भेटून माहिती दिली होती. पुरावे दिले होते. मात्र, त्यांच्यावर कारवाई झाली नाही. 

मंत्र्याच्या ‘पीए’चे चाळे 
एका मंत्र्याच्या पीएचे महिलेसोबतची अश्‍लील क्लीप माझ्याकडे आहे. तो मंत्री व पीए कशा पद्धतीने काम करतात, याची वरिष्ठांना माहिती दिली आहे. मात्र, कारवाई झालेली नाही, असेही खडसेंनी स्पष्ट केले. 

...तर पुढचे पाऊल 
माझ्या मुलीला विधानसभेत पाडण्यासाठी कोणी प्रयत्न केला, तेही पुरावे मी वरिष्ठांना दिले आहेत. माझा काही गुन्हा असेल तर शिक्षा करा, भ्रष्टाचार केला असेल, तर कडक शिक्षा करा, चूक झाली असेल तर ते सांगा. झोटिंग समितीचा अहवाल क्लीन असल्यावरही माझ्यावर अन्याय का? मी काय गुन्हा केला आहे? याची उत्तरे पक्षाकडे मी मागणार आहे. सध्या या षडयंत्रावर पुस्तक लिहित आहे. त्यात सर्व बाबी पुराव्यानिशी मांडणार आहे. कोरोना संसर्गानंतर सर्व वरिष्ठांना दाखवेल. तरीही कारवाई झाली नाही तर राजकीय क्षेत्रात पुढील पाऊल उचलणार आहे.