खडसेंचा भाजपला ‘जय श्रीराम’, राष्ट्रवादीत प्रवेशाची केवळ औपचारिकता 

सचिन जोशी
Wednesday, 21 October 2020

खडसेंच्या प्रवेशाला हिरवा कंदील देण्यात आला. खडसेंना पक्षात घेतल्यानंतर नेमकी कोणती जबाबदारी द्यावी, यावर गेल्या १५ दिवसांपासून खल झाला. ते सूत्र ठरल्यानंतर अखेर त्यांचा प्रवेश निश्‍चित झाला आहे. 

जळगाव : गेल्या महिनाभरापासून राष्ट्रवादीतील प्रवेशाची चर्चा सुरु असताना अखेर भाजपतील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी आज पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांसह प्रदेश कार्यालयात हा राजीनामा देण्यात आला असून आता खडसेंच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाची केवळ औपचारिकता बाकी आहे. 

आवश्य वाचा- खडसेंनी दिले राष्ट्रवादीत जाण्याचे स्पष्ट संकेत; जयंत पाटलांच्या ट्विट केले रिट्विट !
 

फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळातून राजीनामा दिल्यापासून खडसे पक्ष नेतृत्वावर नाराज होते. विधानसभेसाठी उमेदवारी नाकारल्यानंतर खडसेंची नाराजी वाढली. नंतर राज्यसभा व विधानपरिषदेबाबत आश्‍वासन देऊनही त्याची पूर्तता न झाल्याने यामागे केवळ फडणवीस असल्याची तोफ डागत खडसेंनी राज्यातील भाजप नेतृत्वाला आव्हान दिले. 

गेल्या महिन्यापासून त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाची चर्चा सुरु झाली होती. शरद पवार यांनी खडसेंच्या प्रवेशाबाबत स्थानिक नेत्यांशी चर्चा करत चाचपणी केली, त्यानंतर खडसेंच्या प्रवेशाला हिरवा कंदील देण्यात आला. खडसेंना पक्षात घेतल्यानंतर नेमकी कोणती जबाबदारी द्यावी, यावर गेल्या १५ दिवसांपासून खल झाला. ते सूत्र ठरल्यानंतर अखेर त्यांचा प्रवेश निश्‍चित झाला आहे. 

याचदरम्यान खडसेंनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे वृत्त आले. मात्र, स्वत: खडसे व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी त्याचे खंडन केले. अखेरीस आज सकाळी खडसेंनी जयंत पाटील यांच्या नरेंद्र मोदींवरील टीकेला रिट्वीट केल्यानंतर त्यांचा राष्ट्रवादीतील प्रवेश पक्का मानला गेला. त्यानंतर काही वेळातच त्यांनी रिट्वीट मागे घेतले, पण पक्ष सदस्यत्वाचा राजीनामाही प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडे पाठवून दिला. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Eknathrao Khadse's resignation of BJP member will join NCP soon