esakal | कोविड काळात डोळ्यांची काळजी घेणे आवश्‍यक

बोलून बातमी शोधा

कोविड काळात डोळ्यांची काळजी घेणे आवश्‍यक
कोविड काळात डोळ्यांची काळजी घेणे आवश्‍यक
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : कोरोनापूर्वी आणि नंतर डोळ्यांची काळजी न घेतल्यास संसर्ग होऊन गंभीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते. काही वेळेस रुग्णाला दृष्टीदेखील गमवावी लागेल, त्यामुळे डोळ्यांची विशेष काळजी प्रत्येकानेच घ्यावी, असा सूर नेत्ररोगतज्ज्ञांच्या चर्चासत्रातून उमटला.

‘आयएमए’तर्फे शुक्रवारी ‘कोविड आणि नेत्ररोग’ या विषयावर चर्चासत्र झाले. त्यात प्रसिद्ध नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अंजली चौधरी, डॉ. दर्शना शाह, डॉ. नीलेश चौधरी सहभागी झाले होते. उपक्रमासाठी आयएमएचे अध्यक्ष डॉ. सी. जी. चौधरी, सचिव डॉ. राधेश्याम चौधरी यांनी पुढाकार घेतला.

लसीचा परिणाम नाही

डॉ. अंजली चौधरी म्हणाल्या, की शासकीय नेत्रालय आणि धर्मादाय नेत्रालय कोरोनामुळे बंद झाले. त्यामुळे नेत्रबिंदूसह इतर नेत्र आजारांच्या शस्त्रक्रिया थांबल्या. अशा स्थितीत नेत्रबिंदूच्या आजाराचे प्रमाण वाढून दृष्टीदेखील जाऊ शकते. कोरोनाच्या लसीचा डोळ्यांवर परिमाण होत नाही. कोरोना काळात थेट तपासणी न करता अंतर राखून मशिनद्वारे तपासणी केली जाते. ब्रेथ शील्डचा वापर करून दोघे सुरक्षित राहू शकतात, असे त्या म्हणाल्या.

तज्ज्ञांचा सल्ला गरजेचा

डॉ. धर्मेंद्र पाटील म्हणाले, की कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता मोतीबिंदू आणि नासुरची शस्त्रक्रिया करण्यापूर्वी कोविड चाचणी करणे गरजेचे आहे. डोळ्यांबाबत काहीही त्रास असल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोरोनामुळे रक्तवाहिनीत एखादी गाठ झाल्यास त्यामुळे दृष्टी कमी होऊ शकते, असे ते म्हणाले.

मोबाईल वापर नको

डॉ. दर्शना शाह म्हणाल्या, की कोविडमध्ये डोळ्यांच्या अश्रूंमध्ये कोरोनाचा संसर्ग असल्याचे प्रमाण ७ टक्क्यांपर्यंत आहे. ऑनलाइन शिक्षण आणि लॉकडाउनमुळे प्रत्येक पालक आपल्या मुलांच्या डोळ्यांबाबत तक्रारी घेऊन येत आहे. डोळ्यांची आणि स्क्रीनची लेव्हल एकच हवी. अंतर कमीत कमी २२ इंच हवे. मोबाईल गेमपासून लांब राहावे.

‘म्युकोरमायकोसिस’बाबत काळजी

डॉ. नीलेश चौधरी म्हणाले, की डोळ्यांच्या पडद्यामध्ये कोरोनामुळे संसर्ग होऊ शकतो. डोळ्याला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये गाठी तयार झाल्यास दृष्टीदेखील जाऊ शकते. म्युकोरमायकोसिसच्या घटना पोस्ट कोविड आजारात वाढल्या आहेत. त्यासाठी योग्य काळजी वेळीच घ्यावी.

संपादन- भूषण श्रीखंडे