कुटूंब खालच्या घरात तरीही चोरट्यांनी साधला डाव

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 17 October 2020

घरीच पाण्याचा प्लान्ट आहे. शुक्रवारी (ता. १६) रात्री हारून पटेल कुटुंबीयांसह खालच्या खोलीत झोपले होते. रात्री अकराच्या सुमारास वरच्या खोलीत झोपलेल्या सलमा पटेल यासुद्धा वरच्या खोलीला कुलूप लावून खालच्या खोलीत झोपण्यास आल्या. 

जळगाव : शहरातील अक्सानगर परिसरात कुटुंबीय खालच्या खोलीत झोपलेले असताना मध्यरात्री चोरट्याने वरच्या खोलीच्या खिडकीची जाळी तोडून प्रवेश करत लाकडी कपाटातून ४० ते ५० हजार रुपयांची रोकड व २० ग्रॅम सोन्याचे दागिने, असा एकूण दीड लाखांचा मुद्देमाल लांबविल्याची घटना शनिवारी (ता. १७) सकाळी समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. 
अक्सानगर परिसरातील गुलशन ए हिंद या हॉटेलच्या पाठीमागे हारून मुसा पटेल (वय ५५) यांचे दुमजली घर आहे. पत्नी फातेमा बी, मुलगा आरीफ पटेल, मुलगी सलमा पटेल, जावई आझाद पटेल व नातवंडांसह ते वास्तव्यास आहेत. एम. पी. अ‍ॅक्वा नावाने त्यांचा जारचा व्यवसाय असून, घरीच पाण्याचा प्लान्ट आहे. शुक्रवारी (ता. १६) रात्री हारून पटेल कुटुंबीयांसह खालच्या खोलीत झोपले होते. रात्री अकराच्या सुमारास वरच्या खोलीत झोपलेल्या सलमा पटेल यासुद्धा वरच्या खोलीला कुलूप लावून खालच्या खोलीत झोपण्यास आल्या. 

शेजारच्या तरुणामुळे प्रकार उघड 
घरासमोर राहणाऱ्या तरुणाने वरच्या घराच्या खिडकीची जाळी तुटलेली असल्याची माहिती पटेल कुटुंबीयांना दिली. त्यानुसार वरच्या खोलीत जाऊन पाहणी केली असता, किचनजवळील रुमचे दोन्ही लाकडी कपाटांचे कुलूप तोडून ते उघडलेले होते. तसेच त्यातील तिजोरीचे कुलूप तुटलेले होते. गाद्याही अस्ताव्यस्त पडलेल्या होत्या. चोरीची खात्री झाल्यावर सलमा पटेल यांनी कपाटात पाहणी केली असता, कपाटाच्या तिजोरीत ठेवलेले जारच्या पाण्याच्या व्यवसायाचे जमविलेले ४० ते ५० हजार रुपयांची रोकड नव्हती. तसेच सलमा यांचे कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिनेही नव्हते. त्यांनी हा प्रकार भाऊ आरीफ पटेल यांना कळविला. त्यांनीही पाहणी केली व तक्रारीसाठी वडील हारून पटेल यांच्यासह एमआयडीसी पोलिस ठाणे गाठले. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon family sleeping room and thief late night