esakal | शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता..पीकविम्याचे पैसे खात्यावर

बोलून बातमी शोधा

crop insurance plan
शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता..पीकविम्याचे पैसे खात्यावर
sakal_logo
By
टिम इ सकाळ

चोपडा (जळगाव) : जळगाव जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी केळी पीकविमा योजनेत सहभागी झाले होते. केळी पिकाचे अतोनात नुकसान होऊनही केळी पीकविमा लाभापासून बरेच शेतकरी वंचित राहिले होते. या शेतकऱ्यांनी कष्टाने उभ्या केलेल्या पिकांचे नुकसान होऊन देखील केळी पीकविमा काढूनही पीकविम्याचे पैसे सहा-सहा महिन्यांपर्यंत मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली होती. याबाबत ‘सकाळ’ने वृत्त प्रकाशित करून शेतकऱ्यांची व्यथा मांडली. अखेर याची दखल घेत तहसीलदार अनिल गावित यांनी कृषी अधिकारी व शेतकरी संघटना पदाधिकारी यांच्यासोबत बैठक घेत चर्चा केली.

शेतकरी संघटनेने घेतला पुढाकार

संबंधित विमा कंपनी नुकसानभरपाई देण्यासंदर्भात कोणतेही हालचाल करीत नसल्याने शेतकरी संघटनेच्या लक्षात आले. त्यामुळे न्यायाच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेने पुढाकार घेतला. निवेदन देऊन तहसीलदाराने सोबत तीन बैठका घेऊन संबंधित पीकविमा कंपनीच्या प्रतिनिधींना हजर राहून संपूर्ण शेतकऱ्यांच्या नुकसानीचा पाढा वाचून दाखवला. वेळीच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई नाही मिळाली तर शेतकरी संघटना शिंगाडा मोर्चा काढला जाईल, असा इशारा देण्यात आला होता.

अन्‌ खात्‍यात रक्‍कम जमा होण्यास सुरवात

तहसीलदार अनिल गावित यांनी विमा कंपनी पदाधिकारी यांच्याशी बोलून त्यांना खडेबोल सुनवून तत्काळ पीकविमा रक्कम भरपाई द्यावी, असे आदेश दिले होते. तहसीलदारांनी वेळोवेळी पीकविमा कंपनीच्या प्रतिनिधीशी पाठपुरावा केला. शेतकरी संघटनेच्या पाठपुराव्याला यश आले व गुरुवारपासून (ता. २२) पीकविमा रक्कम वंचित असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरवात झाली. जिल्ह्यातील २५ ते ३० हजार शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी पीकविम्याचे पैसे मिळाल्याने समाधान व्यक्त केले आहे.

केळी पीकविम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याबद्दल समाधान मिळाले. या वर्षी जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी कापूस पीकविमा काढलेला आहे. बोंडअळीमुळे अतोनात नुकसान झालेले आहे. याकडेही लक्ष घालावे.

- संदीप पाटील, माजी जिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटना, जळगाव

पीकविमा रक्कम संदर्भात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केला, पण त्यांना यश न आल्याने शेवटी शेतकरी संघटनेच्या पुढाकाराने शेतकऱ्यांना केळी पीकविम्याचे रक्कम मिळाली.

- किरण गुर्जर, जिल्हा उपाध्यक्ष, शेतकरी संघटना, जळगाव