सर्वच राजकीय पक्ष शेतकऱ्यांना ओरबडताहेत 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 25 October 2020

कोणत्याही पक्षाची राज्यात सत्ता असो, शेतकऱ्यांना कोणताच फायदा झालेला नाही. आधारभूत किमती केवळ नावाला असतात. प्रत्यक्षात त्यापेक्षा कमी दराने शासकीय खरेदी केंद्रावर खरेदी होते.

जळगाव : राज्यात शेतकऱ्यांच्या रोज आत्महत्या होत आहेत. याला जबाबदार सर्व आमदार, खासदार आहेत. सर्व राजकीय पक्षाचे लोकप्रतिनिधी एकसारखे आहेत. शेतकऱ्यांबद्दल कोणाला काहीही घेणे देणे नाही. नेते वेगवेगळ्या पक्षांत असले तरी आतून ते एकमेकांशी संलग्न असतात. शेतकऱ्यांना ओरबडणे हाच त्यांचा व्यवसाय आहे, असा आरोप शनिवारी (ता. २४) शेतकरी संघटनेचे राज्यअध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. 
शेतकरी संघटनेत शनिवारी अनेक शेतकरी सहभागी झाले. त्यापाश्‍वर्भूमीवर अध्यक्ष पाटील जळगावमध्ये आले होते. 
ते म्हणाले, की कोणत्याही पक्षाची राज्यात सत्ता असो, शेतकऱ्यांना कोणताच फायदा झालेला नाही. आधारभूत किमती केवळ नावाला असतात. प्रत्यक्षात त्यापेक्षा कमी दराने शासकीय खरेदी केंद्रावर खरेदी होते. हे शेतकऱ्यांना कळून चुकल्याने शेतकरी आता शेतकरी संघटनेत येऊ लागले आहे. शेतकऱ्यांची लवकरच अशी लाट येईल, ज्यामुळे शेतकरी संघटन बळकट होऊन राज्यकर्त्यांना त्यांची जागा दाखवेल. 

म्‍हणूनच शेतकरी आत्‍महत्‍या करतोय
राज्यातील दूध संघ, मार्केट समिती, जिनिंग प्रेसिंग आदी क्षेत्र राजकारणांच्या हातात आहे. शेतकऱ्यांकडून कमीत कमी किमतीत कच्चा माल घ्यावयाचा तो व्यापाऱ्यांना विकायचा. पक्का माल जास्तीत जास्त किमतीत नागरिकांना विकायचा. यामुळे शेतकऱ्यांना आधारभूत किंमतही मिळत नाही. सर्वच बाजार समित्यांत हमीभावापेक्षा कमी दरात शेतमाल घेतला जातो. कापूस खरेदी केंद्रावरही कमी किमतीत कापूस खरेदी केला जातो. उत्पादन खर्चापेक्षाही कमी भाव शेतकऱ्यांना मिळतो आणि हेच कारण शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे आहे. केंद्र शासनाने केलेली तीनही कृषीविधेयके शेतकरीविरोधी आहेत. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दुप्पट हमीभाव मिळाला पाहिजे, यासाठी संघटना आंदोलन करेल. शेतकरी संघटनेचे कालिदास आपेट, शिवाजी आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाध्यक्ष म्हणून संजय महाजन (भोरटेक बुद्रुक, ता. भडगाव), पारोळा तालुकाध्यक्ष नामदेव महाजन यांची निवड झाली.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon farmer suicide dicission in political issue