जळगाव जिल्ह्यात आज ५५ नवे कोरोना बाधित

सचिन जोशी
Friday, 4 December 2020

जिल्ह्यातील अन्य तालुक्यांमध्ये किरकोळ संख्येत रुग्ण आढळून येत असताना जळगाव शहरासह भुसावळ व चाळीसगाव तालुक्यात मात्र सातत्याने नवे बाधित समोर येत आहेत.

जळगाव  : जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या घटत असल्याचे सकारात्मक चित्र असले तरी जळगाव शहरासह भुसावळ व चाळीसगाव येथे पुन्हा संसर्ग वाढत असल्याचे दिसत आहे. शुक्रवारी जिल्ह्यात नवे ५५ रुग्ण आढळून आले, तर ५२ रुग्ण बरे झाले. दिवसभरात एक रुग्ण दगावला. 

वाचा-  प्रेम संबंधाच्या संशयावरून भर चौकात तरुणांवर ब्लेडने वार -

जळगाव जिल्ह्यात दिवाळीनंतर रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली होती. आता आठवडाभरापासून ती थोडी नियंत्रणात असल्याचे दिसत असले तरी कमी चाचण्यांमुळे रुग्ण कमी आढळून येत असल्याचे मानले जात आहे. शुक्रवारी प्राप्त आठशे चाचणी अहवालांपैकी ५५ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ५४ हजार ७३८ झाली आहे. तर ५२ रुग्ण बरे झाल्यानंतर बरे होणाऱ्यांचा आकडा ५२ हजार ९३०वर पोचला आहे. गेल्या २४ तासांत भुसावळ तालुक्यातील ७३ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. 

भुसावळ, चाळीसगावला संसर्ग 
जिल्ह्यातील अन्य तालुक्यांमध्ये किरकोळ संख्येत रुग्ण आढळून येत असताना जळगाव शहरासह भुसावळ व चाळीसगाव तालुक्यात मात्र सातत्याने नवे बाधित समोर येत आहेत. शुक्रवारीही भुसावळला १२, चाळीसगाव येथे १३ रुग्ण आढळले. तर जळगाव शहरात ८ नवे बाधित सापडले. जळगाव ग्रामीण, अमळनेर, भडगाव, एरंडोल, जामनेर, रावेर या तालुक्यांत प्रत्येकी १, मुक्ताईनगरला ८, धरणगाव ४, चोपडा ३, असे रुग्ण आढळले. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon fifty-five new corona affected in jalgaon district today