तांत्रिक अडचणी वगळता विद्यापीठाच्‍या परीक्षा सुरळीत 

गजानन पाचपोळ
Tuesday, 13 October 2020

ऑनलाइन व ऑफलाइन परीक्षांना प्रारंभ झाला. सायंकाळी पाचपर्यंत २१३ विषयांसाठी २३ हजार ९६१ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षा दिली.

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पदवी, पदविका व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्ष, अंतिम सत्राच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सोमवार (ता. १२)पासून सुरळीत सुरू झाल्या. पहिल्याच दिवशी सायंकाळी पाचपर्यंत ७० टक्‍के विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे ऑनलाइन परीक्षा दिली. 

विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा १२ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत होत आहेत. एकूण ५३ हजार ५६४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यंदा प्रथमच ऑनलाइन व ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने परीक्षा होत आहेत. ऑनलाइन परीक्षेसाठी ३९ हजार ९० विद्यार्थ्यांनी, तर ऑफलाइन परीक्षेसाठी १४ हजार ४७४ विद्यार्थ्यांनी पर्याय निवडला आहे. सायंकाळी पाचपर्यंत पहिल्या दोन सत्रांतील परीक्षांमध्ये ३५ हजार २९ पैकी २३ हजार ९६१ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षा दिली. 

सोमवारी सकाळी ऑनलाइन व ऑफलाइन परीक्षांना प्रारंभ झाला. सायंकाळी पाचपर्यंत २१३ विषयांसाठी २३ हजार ९६१ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षा दिली. ऑफलाइनसाठी जळगाव, धुळे व नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यांत एकूण १७९ परीक्षा केंद्रे होती. ऑफलाइन परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांच्या तापमानाची इन्फ्रारेड थर्मामीटरद्वारे तपासणी केली जात होती व हातावर सॅनिटायझर टाकून मगच प्रवेश दिला जात होता. परीक्षा हॉलमध्ये एकूण क्षमतेच्या ५० टक्केच विद्यार्थ्यांची बसण्याची व्यवस्था योग्य ते शारीरिक अंतर राखून करण्यात आली होती. 

जिल्‍हाधिकाऱ्यांकडून पाहणी 
कुलगुरू प्रा. पी. पी. पाटील, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी मुळजी जेठा महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर भेट देऊन पाहणी केली. या वेळी सिनेट सदस्य तथा देखरेख समिती सदस्य प्रा. अनिल पाटील, विष्णू भंगाळे, डॉ. के. जी. कोल्हे, मनीषा चौधरी उपस्थित होते. प्राचार्य एस. एन. भारंबे यांनी केंद्राच्या व्यवस्थेविषयी माहिती दिली. या वेळी आंतरविद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा. अशोक राणे उपस्थित होते. कुलगुरू प्रा. पी. पी. पाटील यांनी आय.एम.आर. व जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयाला भेट देऊन पाहणी केली. सायंकाळी त्यांनी धरणगाव व एरंडोल येथील परीक्षा केंद्रांनाही भेटी दिल्या. 

तांत्रिक अडचणींची सोडवणूक 
काही ठिकाणी विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षेबाबत तांत्रिक अडचणी आल्या त्या विद्यापीठाने सोडविल्या. तीन तासांचा विंडो कालावधी दिल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना लॉगइन करताना अडचणी येत होत्या त्या दूर झाल्या. उद्भवणाऱ्या तांत्रिक अडचणी Chatbot तसेच महाविद्यालयनिहाय नियुक्त केलेल्या आय.टी. समन्वयकामार्फत तत्काळ दूर करण्यात आल्या. 

विद्यापीठात वॉर रूम 
परीक्षा विभागात वॉर रूमची स्थापना केली आहे. तांत्रिक अडचणी उद्‌भवल्या तर त्या तत्काळ वॉर रूममधील प्राध्यापकांनी जलदगतीने सोडविल्या. प्रा. के. एफ. पवार यांच्यासह डॉ. नवीन दंडी, डॉ. अमरदीप पाटील, डॉ. सी. टी. आगे, प्रा. मनोज पाटील, मनोज निळे काम पाहत असून, दिलीप लोहार सहकार्य करीत आहेत. परीक्षा सुरळीत व्हाव्यात यासाठी प्रभारी कुलसचिव प्रा. बी. व्ही. पवार, अधिष्ठाता प्रा. ए. बी. चौधरी व परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक भटुप्रसाद पाटील, परीक्षा विभागातील अधिकारी व कर्मचारी प्रयत्नशील आहेत. 

दिव्यांग विद्यार्थिनीला घरपोच पेपर 
विद्यापीठाने दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षा देताना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी काळजी घेतली आहे. आरती निकम या एम.एस.डब्ल्यू.च्या विद्यार्थिनीला ऑफलाइन परीक्षा देण्यासाठी परीक्षा केंद्रावर येणे शक्य नसल्यामुळे कोल्हेनगर येथील तिच्या निवासस्थानी दूताकरवी पेपर दिला व तो सोडविल्यानंतर परत घेण्यात आला. विद्यापीठाने केलेल्या या व्यवस्थेबद्दल आरतीने समाधान व्यक्त केले. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon final year examination of the school has started and the examination is being conducted online and offline.