
कृषी महाविद्यालय व खासगी विनाअनुदानित महाविद्यालयांतील शिष्यवृत्तीबाबतही हीच बोंब आहे. खानदेशातील कृषितंत्र विद्यालये राहुरी विद्यापीठाशी संलग्न असून, त्यांचीही हीच अवस्था आहे.
जळगाव : राज्यातील कृषी विद्यापीठांशी संलग्न सुमारे तीनशे कृषितंत्र विद्यालयातील तीन हजारांवर कर्मचाऱ्यांवर दहा महिन्यांपासून वेतन नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. या विद्यालयांमधील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठीची शिष्यवृत्ती थकल्याने ही वेळ आली असून, इतर खासगी विनाअनुदानित महाविद्यालयांमधील असे हजारो कर्मचारी याच समस्येमुळे अडचणीत आले आहेत.
आवश्य वाचा- Success story:संयम, चिकाटी, परिश्रमावर मात करत मानसी पाटील बनल्या जिल्हाधिकारी
राज्यात राहुरी, दापोली, अकोला आणि परभणी या चार कृषी विद्यापीठांशी जवळपास २९२ कृषितंत्र विद्यालये संलग्न आहेत. या विद्यालयांमधून पदविका अभ्यासक्रम चालविला जातो. राहुरी विद्यापीठांतर्गत सर्वाधिक ९६ तंत्रविद्यालये चालतात.
कृषी-तंत्रज्ञानाचे धडे
या तंत्रविद्यालयांमध्ये प्रत्येकी सरासरी आठ ते दहा कर्मचारी आहेत, तर साधारण शंभर ते सव्वाशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ज्यांना पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेणे शक्य होत नाही, ती ग्रामीण भागातील मुले पदविका अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊन शेतीसंबंधी धडे गिरवितात.
आर्वजून वाचा- Success story : एक गाव असे.. पहा कसे नटले; शहरात नाही ते सारे गावात
प्रत्येकी २७ हजारांचे शुल्क
तंत्रविद्यालयात बहुतांश मागासवर्गीय विद्यार्थी शिक्षण घेतात, त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचे शैक्षणिक शुल्क आकारले जात नाही. या अभ्यासक्रमासाठी साधारण प्रत्येकी २७ हजारांचे शैक्षणिक शुल्क असून, ही रक्कम शासन शिष्यवृत्ती म्हणून देते. त्यातून विद्यालयातील कर्मचाऱ्यांचे वेतन व अन्य खर्च भागविला जातो. मात्र दहा महिन्यांपासून ही शिष्यवृत्तीच मिळाली नसल्याने राज्यभरातील २९२ विद्यालयांमधील कर्मचाऱ्यांचे वेतनही होऊ शकलेले नाही.
ऑनलाइन शिक्षण सुरूच
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा-महाविद्यालये बंद आहेत. मात्र, तंत्रज्ञानाची कास धरलेल्या कृषितंत्र विद्यालयांनीही पुढाकार घेत विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण उपलब्ध करून दिले आहे. असे असूनही त्यांची शिष्यवृत्ती थकल्याने कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. कृषी महाविद्यालय व खासगी विनाअनुदानित महाविद्यालयांतील शिष्यवृत्तीबाबतही हीच बोंब आहे. खानदेशातील कृषितंत्र विद्यालये राहुरी विद्यापीठाशी संलग्न असून, त्यांचीही हीच अवस्था आहे.
वाचा- भाजपच्या धर्तीवर राष्ट्रवादीचीही आता पक्षबांधणी
अशी आहे स्थिती
कृषी विद्यापीठे : ४
संलग्न तंत्रविद्यालये : २९२
कर्मचारी सुमारे : तीन हजार
विद्यार्थी सुमारे : २५ हजारांवर
दहा महिन्यांपासून कृषितंत्र विद्यालयातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती थकल्याने कर्मचारी वेतनाविना आहेत. यासंदर्भात त्वरित कार्यवाही करून शिष्यवृत्तीची रक्कम अदा करण्याबाबत राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू, मुख्यमंत्री, कृषिमंत्र्यांना पत्र दिले आहे.
- नितीन विसपुते,
प्राचार्य, कृषितंत्र विद्यालय, नंदुरबार
संपादन- भूषण श्रीखंडे