
दीड हजार लोकवस्तीचे गाव. नरडाणा रेल्वेस्थानकापासून दीड किलोमीटर आणि मुंबई- आग्रा महामार्गावरील गोराणे फाट्यापासून चार किलोमीटरवर आहे. गावात प्रवेश करताना एक भव्य गावदरवाजा स्वागत करतो.
सोनगिर (धुळे) : ग्रामस्थांची एकजूट असल्यास गावाची प्रगती व्हायला वेळ लागत नाही, हे वाघोदे (ता. शिंदखेडा) गावाने दाखवून दिले आहे. आदर्श गाव होण्याकडे गावाची वाटचाल सुरू आहे. श्रमदानाने कायमस्वरूपी पाणीटंचाई दूर केली, पण गावाच्या वर्गणीतून भव्य विठ्ठल-रखूमाई मंदिर व विविधोपयोगी सभागृह उभारले जात आहे.
वाघोदे हे दीड हजार लोकवस्तीचे गाव. नरडाणा रेल्वेस्थानकापासून दीड किलोमीटर आणि मुंबई- आग्रा महामार्गावरील गोराणे फाट्यापासून चार किलोमीटरवर आहे. गावात प्रवेश करताना एक भव्य गावदरवाजा स्वागत करतो. डाव्या बाजूला विठ्ठल- रखूमाई मंदिर, तर उजव्या बाजूला जलकुंभ आणि जिल्हा परिषदेची मराठी शाळा आहे. गावात घरोघरी निंबाची झाडी दिसून येतात. ती हिरवाई पाहून मन प्रसन्न होते.
दिवसाआड पाणीपुरवठा
गावाला चार किलोमीटरवरील अजंदे (बुद्रुक) येथे पांझरा नदीतील विहिरीतून पाणीपुरवठा होतो. पावसाळ्यात गढूळ पाणी येऊ नये, म्हणून सरपंच गोविंदा वाघ यांनी नदीपात्रातील विहिरीचे तीन फूट उंच काँक्रिटीकरण केले. आता यापुढे गावाला स्वच्छ पाणी मिळेल. नाल्याने गावाचे जुने गाव व नवे गाव असे दोन भाग झाले आहेत. घरोघरी नळ असून, दिवसाआड दीड तास नळाद्वारे पाणी मिळते. गावाच्या चारही कोपऱ्यांत दोन महिन्यांपूर्वी जनावरांना पाणी पिण्यासाठी पाणवठे बनवले. गरिबांसाठी सार्वजनिक नळ आहेत. प्रत्येक घरी शोषखड्डे असून, वापरलेले पाणी पुन्हा जिरवले जाते. पूर्वी दोनशे फुटावर लागणारे पाणी शंभर फुटावर लागत आहे.
ग्रामपंचायत तरी भुमिगत गटार
घरोघरी शौचालय असून, सार्वजनिक शौचालयांत नळव्यवस्था आहे. शौचालयाचे पाणी वाहून नेण्यासाठी भूमिगत गटारी असल्याने कुठेही घाण नाही. गटारीतून वाहून जाणाऱ्या पाण्याची पुनर्वापरासाठी व्यवस्था केली जात आहे. बहुतांश गावात अगदी गल्लीबोळातही काँक्रिटीकरण झाले आहे.
गावातील एकजूट
गेल्या वर्षी वॉटर कप अभियानात गावाला तृतीय क्रमांकाचे चार लाखांचे पारितोषिक मिळाले. गावाने वर्गणीतून भव्य विठ्ठल-रखूमाई मंदिर बांधले. तीर्थक्षेत्र विकास योजनेतून ३६ लाख रुपये मिळाले असून, सभागृह बांधले जात आहे. सर्व खर्च ८० लाख रुपये येण्याची शक्यता आहे. शेतीविषयक, नोकरीविषयक उपक्रम राबविले जात असल्याने गावाचे जीवनमान उंचावले आहे. ग्रामविकास अधिकारी किशोर बडगुजर, उपसरपंच गणेश पाटील, सदस्य नगराज पाटील, संतोष माळी, किशोर पाटील, ढोमन माळी, हिरकनबाई मोरे, ज्ञानेश्वर पाटील यांचे सहकार्य मिळत आहे.
संपादन ः राजेश सोनवणे