esakal | चोरीला गेले पशुधन, आणि ते शोधण्यासाठी चक्क पोलिस ठाण्यातच लागल्या रांगा !
sakal

बोलून बातमी शोधा

चोरीला गेले पशुधन, आणि ते शोधण्यासाठी चक्क पोलिस ठाण्यातच लागल्या रांगा !

कारवाई होत नसल्याने यामागे पोलिस, महापलिकेचा आरोग्य विभागाचाही मोठा आर्थिक वाटा असल्याचे बोलले जात होते. यातूनच मेहरुणच्या कुरेशीवाडाविरुद्ध पिरजादेवाड्यात दंगल उसळली होती. 

चोरीला गेले पशुधन, आणि ते शोधण्यासाठी चक्क पोलिस ठाण्यातच लागल्या रांगा !

sakal_logo
By
रईस शेख


जळगाव  : पाळधी (ता. धरणगाव) येथील अवैध कत्तलखान्यावर सहाय्यक पोलिस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी कारवाई केली. कत्तलीसाठी चोरी करून आणलेली जनावरे मोठ्या प्रमाणावर आढळून आली आहेत. पोलिस कारवाईनंतर गेल्या तीन महिन्यांत जनावरे चोरीला गेलेल्या तक्रारदारांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात तक्रारीसाठी धाव घेतली. रात्री जप्त केलेल्या जनावरांमध्ये आपले पशुधन शोधण्यासाठी गो-शाळेतही गर्दी उलटली हेाती. 

शहरातील रामानंदनगर, हरिविठ्ठलनगर, विद्युत कॉलनी, शिव कॉलनी, रामेश्‍वर कॉलनी, अयोध्यानगर, महाबळ कॉलनी, दूध फेडरेशनचा परिसर, शिवाजीनगर, ममुराबाद रोडसह शहरातील अन्य ठिकाणांहून मोठ्या प्रमाणात गायी- बैल, गोऱ्हे चोरीला जाण्याच्या घटना समोर आल्या आहेत. 

चोरी, कत्तलीमागे मोठी ‘चैन’ 
एखादे गाय-बैल किंवा गोऱ्हे चोरून नेण्यापासून ते कत्तलखान्यात विक्रीनंतर त्याची विल्हेवाट लावण्यापर्यंतची साखळी कार्यरत आहे. तक्रार करूनही कारवाई होत नसल्याने यामागे पोलिस, महापलिकेचा आरोग्य विभागाचाही मोठा आर्थिक वाटा असल्याचे बोलले जात होते. यातूनच मेहरुणच्या कुरेशीवाडाविरुद्ध पिरजादेवाड्यात दंगल उसळून मार खावा लागला. तरी गुन्ह्यातील संशयित अद्याप फरार आहेत. सहाय्यक पोलिस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या विशेष प्रयत्नांतून पाळधीतील कारवाईनंतर चोरट्यांसह संपूर्ण ‘नेटवर्क’ हादरले आहे. 

तक्रारदारांच्या रांगा 
ईश्‍वर किशोर तायडे (रा. हरिविठ्ठलनगर) याची लाल रंगाची गाय १३ सप्टेंबरला चोरी झाली. सुनील मधुकर सोनवणे (रा. विद्युत कॉलनी) यांची गाय, प्रमोद शरद इंगळे यांची गाय व गोऱ्हा (१३ सप्टेंबर), आत्माराम श्‍यामराव कुंभार (रा. संत मीराबाईनगर) यांची गाय व गोऱ्हा, किशोर बळिराम सपकाळे यांची गाय व गोऱ्हा, प्रमोद रंगराव पाटील (रा. विद्युत कॉलनी) याच्या तीन गायी, अरुण हिलाल पाटील, चंचल काशिनाथ मानकुंबरे यांच्या घराजवळून चोरट्यांनी जनावरे पळविली आहेत. 

मजबूत साखळी 
मोकाट रस्त्यावर फिरणाऱ्या जनावरांसाठी कोंडवाड्याची संकल्पना राबविली जाते. पालिका, महापालिका यासाठी विशिष्ट लोकांना याचा ठेका देते. वाहतुकीला अडथळा, अपघाताला कारणीभूत ठरू नये यासाठी ठेकेदाराची माणसे ही जनावरे उचलून नेतात. संबंधितास रीतसर दंड अदा केल्यावर जनावर परत दिले जाते. मात्र, तेथूनच मोकाट जनावरांचा कत्तलखान्याचा प्रवास सुरू होत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. तवेरा, स्कॉर्पिओ, स्वीफ्टसारख्या आलिशान गाड्यांमधून गुरे चोरून नेली जातात. पोलिसांसह आरेाग्य विभागाचेही अवैध कत्तलखान्यांकडे हप्तेखोरीमुळे दुर्लक्ष झाले असून, यामागे मोठी साखळी असल्याचे सांगितले जात आहे. 

संपादन- भूषण श्रीखंडे