पीडित मुलीची आई म्‍हणतेय..पोलिसांवर विश्‍वास नाही

राजू कवडीवाले
Tuesday, 27 October 2020

कैफियत मांडल्यानंतर त्यांच्या आदेशानुसार अप्पर पोलिस अधीक्षक यांनी जबाब घेण्यासाठी २३ ऑक्टोबरला बोलावत जबाब घेत असताना पोलिस निरीक्षक यांनी ‘पैसे घेऊन ही केस मिटवून टाक; अन्यथा मी खोट्या गुन्ह्यांमध्ये तुला अटकवेल’, अशी धमकी दिली.

यावल (जळगाव) : तालुक्यातील राजोरा येथील अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी यावल पोलिसांसह पोलिस निरीक्षकांवर आपला विश्वास राहिला नाही. या घटनेचा तपास उच्चस्तरीय अधिकाऱ्यांकडे द्यावा, अशी मागणी अल्पवयीन मुलीच्या आई- वडिलांनी आमदार शिरीष चौधरी यांची भेट घेऊन त्यांच्या मुलीसंबंधी घडलेल्या प्रकरणाबाबत लेखी निवेदन देऊन सत्य परिस्थिती सांगितली. 
सदर प्रकरणाची दखल घेऊन आमदार शिरीष चौधरी यांनी जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे व अप्पर पोलिस अधीक्षक श्री. गवळी यांच्याशी तत्काळ फोनवर संपर्क करून या प्रकरणात दोषी असणाऱ्या आरोपींवर तसेच आरोपीसोबत सामील असणाऱ्या संशयित अधिकाऱ्याची देखील चौकशी करून कठोर कारवाई करण्याची विनंती केली. 

मुलीच्या आईने दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे, की आमच्या मुलीस १० आक्टोबरला घरातून पळवून नेल्याचे समजल्यानंतर संशयित कुटुंबाविषयी यावल पोलिसात तक्रार दाखल केली होती. दरम्यान, १३ आक्टोबरला मुलीला तसेच संशयित मुलाला यावल पोलिस ठाण्यात हजर केल्यानंतर पोलिस निरीक्षक यांनी कोणतीही कायदेशीर कार्यवाही म्हणजेच वैद्यकीय तपासणी किंवा बालसुधारगृहात रवानगी केली नसल्याने १६ आक्टोबरला मुलीच्या पालकांनी पोलिस अधीक्षक प्रवीण मुंढे यांच्याकडे तक्रारीविषयी लेखी कैफियत मांडली. 

पैसे घेवून केस मिटव
याच प्रकरणात २० आक्टोबरला दुसरी कैफियत मांडल्यानंतर त्यांच्या आदेशानुसार अप्पर पोलिस अधीक्षक यांनी जबाब घेण्यासाठी २३ ऑक्टोबरला बोलावत जबाब घेत असताना पोलिस निरीक्षक यांनी ‘पैसे घेऊन ही केस मिटवून टाक; अन्यथा मी खोट्या गुन्ह्यांमध्ये तुला अटकवेल’, अशी धमकी दिली. त्या दिवशी आमच्या सांगण्यानुसार जबाब न घेता त्यांनी जबाब आम्ही जाण्याच्या आधीच तयार करून त्यावर आमच्या सह्या घेतल्या. परंतु आम्ही पोलिस ठाण्याच्या बाहेर आल्यानंतर सदरील जबाब वाचला असता तो आमच्या सांगण्यानुसार नसल्यामुळे आम्ही ही बाब परत अप्पर पोलिस अधीक्षक यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर त्यांच्या आदेशानुसार तो जबाब रद्द करुन आम्हाला स्वतः जबाब लिहिण्यास सांगितला. या सर्व प्रकारामुळे आमचा संपूर्ण कुटुंबाचा पोलिस यंत्रणेवर विश्वास राहिलेला नाही. म्हणूनच यापुढे सर्व कायदेशीर प्रकरणाचा तपास यावल पोलिस निरीक्षक यांच्याकडून काढून घेण्यात येऊन सदरील तपास उच्चस्तरीय पोलिस अधिकारी यांच्याकडे देण्यात यावा, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 

उच्चस्तरीय चौकशीची मागणी 
पीडित मुलीच्या पालकांनी निवेदनात म्हटले आहे, की माझी मुलगी अल्पवयीन असल्याने ती १३ ते २४ ऑक्टोबरपर्यंत आरोपीच्या सान्निध्यात असल्याने तिचा शारिरीक व लैंगिक छळ केला गेला असल्याची दाट शक्यता आहे. तरी माझ्या मुलीची वैद्यकीय तपासणी करावी. सदरील कार्यवाहीस विलंब होत असल्यामुळे आरोपी व पोलिस निरीक्षक यांचे साटेलोटे असल्याचे आमच्या निदर्शनास येत आहे. त्यामुळे या प्रकरणात दोषी असणाऱ्या तपासातील पोलिस यंत्रणेतील अधिकारी व कर्मचाऱ्याची उच्चस्तरीय चौकशीची मागणी मी करीत आहे. तसेच दोषींवर कार्यवाही होऊन मला व माझ्या कुटुंबियांना न्याय मिळावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon girl kidnapping case don't trust the police