यंदाचा पाणीप्रश्‍न मिटला; सलग दुसऱ्या वर्षी ‘गिरणा’ची शंभरी! 

यंदाचा पाणीप्रश्‍न मिटला; सलग दुसऱ्या वर्षी ‘गिरणा’ची शंभरी! 
Updated on

भडगाव  : जिल्ह्यासाठी संजीवनी ठरलेले गिरणा धरण आज सायंकाळी सहाच्या सुमारास शंभर टक्के भरले. मात्र, धरणातून अद्याप पाणी सोडण्यात येणार नसून, पाणलोट क्षेत्रातील धरणाची आवक पाहून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे गिरणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता धर्मेंद्रकुमार बेहरे यांनी सांगितले. गिरणा धरण सलग दुसऱ्या वर्षी शंभर टक्के भरले असून, शेती सिंचनासह पाणीप्रश्‍न मिटल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. 

गिरणा धरणात एक जूनला ३१ टक्के जिवंत जलसाठा होता. तीन महिन्यांत धरणात ७१ टक्के जलसाठा वाढला. धरणात सध्या २१ हजार ५०० दशलक्ष घनफूट एवढा साठा आहे. गिरणा नदीवरील जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, धरणगाव या शहरांसह ग्रामीण भागातील १५८ गावांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. गिरणा धरण सलग दुसऱ्या वर्षी शंभर टक्के भरल्याने रब्बी हंगाम चांगलाच बहरणार आहे. 

सतर्कतेचा इशारा 
गिरणा धरण शंभर टक्के भरले असले, तरी अद्याप त्यातून पाणी सोडण्यात आलेले नाही. धरणात चारशे ते पाचशे क्यूसेसने पाण्याची आवक सुरू असून, ती वाढल्यास धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे गिरणा पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले. मात्र, ‘गिरणा’काठावरील ग्रामस्थांनी सतर्कता बाळगावी, असा इशारा कार्यकारी संचालक कांबळे, मुख्य अभियंता मोरे, अधीक्षक अभियंता आमले, कार्यकारी अभियंता धर्मेंद्रकुमार बेहरे, उपविभागीय अधिकारी हेमंत पाटील, शाखा अभियंता एस. आर. पाटील यांनी दिला आहे. 
 

दहाव्यांदा भरले शंभर टक्के! 
गिरणा धरण दहाव्यांदा शंभर टक्के भरले, तर दहा वेळा नव्वद टक्क्यांवर गेले होते. १९७३ मध्ये गिरणा धरण पहिल्यांदा जलसंपन्न झाले. त्यानंतर १९७६, १९८०, १९९४ नंतर २००४ ,२००५, २००६, २००७ असे सलग चार वेळा आणि त्यानंतर तब्बल एक तपानंतर भयानक दुष्काळाच्या झळा सोसल्यानंतर गतवर्षी हे धरण पूर्णक्षमतेने भरले. दहा वर्षांच्या काळात एका वेळी गिरणा धरणाने तळ गाठला होता. त्या वेळी केवळ सात टक्के मृतसाठा शिल्लक राहिला होता. यंदा सलग दुसऱ्या वर्षी ‘गिरणा’ने शंभरी गाठली आहे. 
 
गिरणा धरण दृष्टिक्षेपात... 
- धरणाची क्षमता...२१,५०० दशलक्ष घनफूट 
- धरणाचा मृतसाठा..३,००० दशलक्ष घनफूट 
- उपयुक्त जलसाठा...१८,५०० दशलक्ष घनफूट 
- सद्य:स्थितीला उपयुक्त साठा.. १८,५०० दशलक्ष घनफूट 
- एकूण लाभक्षेत्र... ६९,००० हेक्टर 
- जळगाव जिल्हातील एकूण लाभक्षेत्र....५७,२०९ हेक्टर 
- जलसिंचनाचे फायदे मिळणाऱ्या तालुक्यांची संख्या...०८ 
- धरणावर अवलंबून पाणीपुरवठा योजना...१५८ ग्रामीण व चार पालिकेच्या योजना 


गिरणा धरणात बुधवारी सायंकाळी शंभर टक्के साठा झाला. मात्र, अद्याप पाणी सोडण्यात आलेले नाही; परंतु नदीकाठच्या गावांनी सतर्कता बाळगावी. 
- धर्मेंद्रकुमार बेहरे, कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे, जळगाव 

गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाण्याची आवक पाहून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. आवक वाढल्यास पाणी सोडण्यात येईल. 
- हेमंत पाटील, उपविभागीय अधिकारी, गिरणा पाटबंधारे, चाळीसगाव 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com