ग.स. सोसायटीच्‍या सभासदांसाठी मोठी घोषणा

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 10 November 2020

जिल्ह्यात सुमारे चाळीस हजार सभासद सोसायटीचे आहेत. शेअर्सच्या प्रमाणात ९ कोटी ८८ लाख ८८३ रूपयांचे वाटप होणार आहे. उद्या सकाळी दहा पासून संबधित शाखेत सभासदांना लाभाशांच्या चेकचे वाटप होईल. 

जळगाव : येथील जळगाव जिल्हा सरकारी नोकराची पतपेढीतर्फे (ग.स.सोसायटी) यंदा सभासदांना १० टक्के लाभांश जाहीर करण्यात आला आहे. उद्यापासून (ता.११) संबंधित शाखामध्ये चेकने तो वाटप होईल. लाभांश गतवषी सात टक्के दिला होता. यंदा १० टक्के दिला जात असल्याची माहिती ग.स.सोसायटीचे अध्यक्ष मनोज पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 
लोकसहकार गटाचे गटनेते विलास नेरकर, उपाध्यक्ष सुनिल पाटील, कर्मचारी नियंत्रण समितीचे अध्यक्ष विश्‍वास सूर्यवंशी, कर्ज समिती अध्यक्ष अनिल गायकवाड पाटील, संचालक तुकाराम बोरोले, दिलीप चांगरे, सुनिल पाटील, यशवंत सपकाळे आदी उपस्थित होते. 

दिवाळीपूर्वी बोनस मिळावा अशी मागणी सभासदांची होती. कोरोनामुळे लाभांश दिला जात नव्हता. राज्यपालांनी नुकताच आदेश देवून त्यात सहकारी संस्था लाभांश जाहीर करू शकतात असे सांगितल्याने दहा टक्के लाभांश देण्यात ठरविण्यात आले आहे. जिल्ह्यात सुमारे चाळीस हजार सभासद सोसायटीचे आहेत. शेअर्सच्या प्रमाणात ९ कोटी ८८ लाख ८८३ रूपयांचे वाटप होणार आहे. उद्या सकाळी दहा पासून संबधित शाखेत सभासदांना लाभाशांच्या चेकचे वाटप होईल. 

दिव्यांगांना जादा कर्ज 
सोसायटीचे जे सभासद दिव्यांग आहेत त्यांना एक लाख जादा कर्ज मंजूर करण्यात आले आहे. विशेष कर्ज मर्यादा ४ लाखावरून ६ लाख ५० हजारापर्यंत करण्यात आली आहे. महापालिकेकडे साडेपाच कोटीची थकबाकी होती. ती पाच कोटींपर्यंत वसूल करण्यात आली आहे. 

तीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती 
कोरोना संसगामुळे तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या वारसांना सेवेत सामावून घेतले आहे. जनता अपघात विमा एक लाखावरून तीन लाखापर्यंत करण्यात आला आहे. कर्ज बुडव्यांवर वसुली दावे १०१ चे व ९ प्रमाणे दावे दाखल करण्यात आले आहे. संस्थेच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. 
 
संचालक मंडळ ३१ डिसेंबरपर्यंत 
लोकसहकार गटाची मुदत संपली असली तरी शासनाने संचालक मंडळाला ३१ डिसेंबर २०२० पयंर्त मुदत वाढ दिली आहे. त्यानंतर शासन जा आदेश देईल त्याचे पालन करण्यात येणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon goverment employee society declear member