"कोविड-19'चे संकट : शासनाने निधी ‘ब्लॉक’केल्याने...महिला रुग्णालयाच्या कामाला लागला "ब्रेक'

सचिन जोशी 
गुरुवार, 9 जुलै 2020

महिलांसाठी स्वतंत्र असलेल्या या रुग्णालयाच्या कामासाठी 68 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. दोन टप्प्यांत हे काम होणार असून, पहिल्या टप्प्यात शंभर खाटांचे सुसज्ज हॉस्पिटल, दुसऱ्या टप्प्यात या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने होणार आहेत.

जळगाव: महिलांसाठी स्वतंत्र शंभर खाटांचे भव्यदिव्य हॉस्पिटलचे काम सुरू असताना "कोविड-19'चे संकट आले आणि या कामालाही त्याचा फटका बसला. रुग्णालयाच्या कामासाठी पाच ते सहा कोटींच्या निधीची तरतूद होती. संबंधित हेडखाली हा निधी दिसतही होता. मात्र शासनाने हा उपलब्ध निधी "ब्लॉक' केल्यामुळे या हॉस्पिटलचे काम रखडले. हा निधी मिळाला असता तर हॉस्पिटलमधील एका विंगचे काम पूर्ण होऊन ते "कोविड-19'च्या रुग्णांसाठी अथवा क्वारंटाइन सेंटर म्हणून उपयुक्त ठरले असते. 
जळगाव तालुक्‍यातील मोहाडी शिवारात जिल्ह्यासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या शंभर खाटांच्या स्वतंत्र महिला रुग्णालयास तत्कालीन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी मंजुरी देताना त्यासाठी शंभर कोटींच्या निधीची घोषणा केली होती. रुग्णालयाचे कामही सुरू झाले होते. 

असे होणार काम 
महिलांसाठी स्वतंत्र असलेल्या या रुग्णालयाच्या कामासाठी 68 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. दोन टप्प्यांत हे काम होणार असून, पहिल्या टप्प्यात शंभर खाटांचे सुसज्ज हॉस्पिटल, दुसऱ्या टप्प्यात या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने होणार आहेत. पैकी रुग्णालयाचे पहिल्या टप्प्यातील काम सुरू झाले आहे. त्यात प्रत्येक दोन हजार चौरस फुटांचे तीन ते चार विंग होणार असून, पहिल्या विंगचे काम अंतिम टप्प्यात आहे. 

निधी "ब्लॉक' केल्याने काम ठप्प 
रुग्णालयातील पहिल्या विंगचे काम अंतिम टप्प्यात आहे. गेल्या आर्थिक वर्षाखेरपर्यंत पाच कोटींचा निधी या रुग्णालयाच्या हेडवर दिसत होता. शासनाने तरतूद केलेला हा निधी खर्च करण्याच्या बेतात असताना कोरोनाचे संकट उभे राहिले. त्यामुळे शासनाने सर्व विकासकामांवरील निधी "ब्लॉक' करून ठेवला. त्यामुळे खात्यावर दिसत असूनही हा निधी संबंधित विभागाला या कामासाठी खर्च करता आला नाही. शिवाय, कंत्राटदाराने केलेल्या कामाचे पाच ते सहा कोटींचे देणेही अद्याप बाकी असल्याने हे काम ठप्प झाले आहे. 

विशेष पाठपुराव्याची गरज 
हा भाग पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या जळगाव ग्रामीण मतदारसंघातील असल्याने त्यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे, आरोग्य विभागाचे सचिव व्यास यांच्याशी याबाबत चर्चा केली. मात्र, निधी खुला करण्याचे त्यांचे प्रयत्न अपुरे ठरले. हे काम पूर्ण झाले असते, तर किमान हॉस्पिटलचा एक विंग, त्यातील 50 खाटा कोविड रुग्ण अथवा संशयितांसाठी वापरता आले असते. 

असे असेल हॉस्पिटल 
रुग्णालयाचा दर्जा : महिलांसाठी स्वतंत्र 
एकूण खाटा : 100 
एकूण अपेक्षित खर्च : 68 कोटी 
कामाचे टप्पे : 2 
आतापर्यंत पूर्ण झालेले काम : 20 टक्के 

(संपादीत- भूषण श्रीखंडे)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Government blockades funds women's hospital building construction 'break'