शासनाचे दुर्लक्ष... आधार नोंदणी केंद्रे लॉकडाऊनच !

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

आधार नोंदणीत जन्म तारीख अपूर्ण, चुकीचे व अपूर्ण नाव, मराठी व इंग्रजी नावात स्पेलिंग मध्ये बदल, मोबाईल नंबर लिंक नसणे यामुळे थम ठेवून पैसे काढणे अडचणीचे झाले आहे.

पारोळा : गेल्या तीन महिन्यापासून कोरोनामुळे लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे. अनलॉक २ सुरू असूनही अद्याप आधार नोंदणी केंद्र बंद असल्याने शेतकऱ्यांसह बँक ग्राहकांची गैरसोय होत आहे. 

अनेकांचे आधार कार्ड नोंदणी अपडेट नसल्याने गरजूंना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तालुक्यातील आधार नोंदणी केंद्रे सुरु करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. याबाबत काही दिवसापूर्वी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना केंद्र चालकांनी आधार नोंदणी सुरू करण्याबाबत निवेदन दिले होते. 

तालुक्यात पूर्वी एकमेव बहादरपूर येथे आधार केंद्रातून नागरिकांना सेवा दिली जात होती. तालुक्यातील आपले सरकार केंद्राचे तीन आधार केंद्रे सुरू करण्याची मान्यता दिली आहे. यात पारोळा, लोणी व बहादरपूर येथील गावांचा समावेश आहे. आधार नोंदणी केंद्रातील चालकांना किटसह इतर साहित्य देखील पुरविण्यात आले आहे. मात्र, जिल्हाधिकारी राऊत यांच्याकडून अद्याप हिरवा कंदील मिळत नसल्याने आधार नोंदणी पासून अनेक जण वंचित आहेत. आधार नोंदणी केंद्र नोंदणीस नियमांचे पालन करून सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणीही नागरिकांकडून केली जात आहे. 

पैसे काढणे मुश्कील 
केंद्र सरकारने सर्व सामान्य नागरिकांना दिलासा मिळावा म्हणून चार वर्षापूर्वी जनधन खाते सुरू केले होते. झिरो बॅलन्सच्या खात्यात अनेकांनी व्यवहार सुरळीत केले. काहींच्या खात्याशी आधार अपडेट नसल्याने खात्याशी अनेक बँक ग्राहकांची पैसे काढण्यासाठी समस्या निर्माण होत आहे. 

तीनच केंद्रांवर भार 
आधार नोंदणीत जन्म तारीख अपूर्ण, चुकीचे व अपूर्ण नाव, मराठी व इंग्रजी नावात स्पेलिंग मध्ये बदल, मोबाईल नंबर लिंक नसणे यामुळे थम ठेवून पैसे काढणे अडचणीचे झाले आहे. शहरासह तालुक्यात आधार संबंधी सेवा देणारी केंद्रे वाढविण्याची गरज आहे. कारण अंगणवाडी, शाळा, शेतकरी सन्मान योजना, बँक लिकींग खाते उघडणे व इतर शासकीय काम करिता आधार कार्ड काढणे गरजेचे आहे. ८३ ग्रामपंचायती असलेल्या तालुक्यात शहरी भागात एक तर ग्रामीण भागात दोन असे तीनच आधार नोंदणी केंद्रे असल्याने अनेक जण नोंदणीपासून वंचित राहत आहे. 

 
आधार अपडेट नसल्याने शेतकरी सन्मान योजनेचा लाभ अद्याप पर्यत मिळाला नाही. यासाठी अधिकारी वर्गाने लक्ष देऊन आधार नोंदणी केंद्रे सुरू करून शेतकऱ्यांची होणारी गैरसोय थांबवावी. 
 दिलीप गोबा पाटील, शेतकरी,पारोळा 

गेल्या अनेक दिवसापासून जनधन खात्यात रक्कम जमा आहे. मात्र, आधार कार्ड अपडेट नसल्याने पैसे काढण्यासाठी बँकेत घिरट्या माराव्या लागत आहेत. आधार नोंदणी लवकर सुरू व्हावी. 
 रंजना भगवान चौधरी, गृहिणी,लालबाग, पारोळा. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Government's negligence aadhaar registration centers are locked down