लोकनियुक्‍त सरपंच नाहीच; मतदारयादींच्या प्रसिध्दीची तयारी 

देवीदास वाणी
Sunday, 29 November 2020

राज्यात भाजपची सत्ता असताना लोकनियुक्त सरपंच निवडून आणण्याची पद्धत सुरू केली होती. ती पद्धत रद्द करून पूर्वीप्रमाणेच सदस्यांमधून सरपंच निवड आता होणार आहे.

जळगाव : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका फेब्रुवारी २०२१ मध्ये होण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने निवडणूक आयोगाने निवडणुका होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या मतदारयाद्या प्रसिद्ध करण्याचे आदेश ग्रामपंचायतींना दिले आहेत. १ डिसेंबरला ग्रामपंचायतींच्या मतदारयाद्या प्रसिद्ध होतील. त्यादृष्टीने निवडणूक विभागाने मतदार याद्या तयार करण्याची प्रक्रिया अंतीम टप्प्यात आल्या आहेत. 
मतदारयाद्या प्रसिद्ध झाल्यानंतर त्यावर हरकती घेण्यासाठी ७ डिसेंबरपर्यंत मुदत आहे. अंतिम मतदारयादी १० डिसेंबरला प्रसिद्ध होईल. मतदारयाद्या प्रसिद्ध करताना त्यांनी दुबार नावे वगळणे, रहिवास सोडून गेलेल्यांची नावे वगळणे, विधानसभानिहाय मतदार आहेत किंवा नाही, याची तपासणी करणे आदी सूचना निवडणूक आयोगाने केलेल्या आहेत. 

फेब्रुवारीत निवडणूकांची शक्‍यता
गेल्या मार्च महिन्यापासून जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींच्या निवडणुका कोरोनामुळे रखडलेल्या आहेत. मार्च महिन्यात मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींची निवडणूकप्रक्रिया जानेवारी, फेब्रुवारी महिन्यांतच सुरू झाली होती. प्रभागरचना, वॉर्डरचना तयारी सुरू होती. तोच कोरोना संसर्गाचा प्रसार झाल्याने सर्वच निवडणुकांना निवडणूक आयोगाने स्थगिती दिली. आता फेब्रुवारीत संबंधित ग्रामपंचायतींच्या निवडणुका होतील, अशी अपेक्षा ठेवून निवडणूक आयोगाने मतदार याद्यांच्या प्रसिद्धी, हरकती, अंतिम मतदारयाद्या तयार करण्याचे आदेश दिले आहेत. 

लोकनियुक्त सरंपच नाही 
राज्यात भाजपची सत्ता असताना लोकनियुक्त सरपंच निवडून आणण्याची पद्धत सुरू केली होती. ती पद्धत रद्द करून पूर्वीप्रमाणेच सदस्यांमधून सरपंच निवड आता होणार आहे. ज्या पक्षाचे सदस्य अधिक निवडून येतील त्याची सत्ता ग्रामपंचायतीवर असेल. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon gram panchayat election voter list publish