म्‍हणून भाजपकडून सुशांतसिंह राजपूत जिंदाबादचा नारा : मंत्री गुलाबराव पाटील

सकाळ वृत्तसेवा
Monday, 19 October 2020

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण हे भाजपाने सोडलेले पिल्लू आहे. भाजपाला बिहारमध्ये राजपूत समाजाची असलेली आठ टक्के मते हवी आहेत. म्हणूनच ते सुशांतसिंह जिंदाबाद असे म्हणत आहेत,' अशी टीका गुलाबराव पाटलांनी केली.

जळगाव : बिहारच्या निवडणुका तोंडावर आहेत. या निवडणूकीत भाजपला राजपूत समाजाची मते मिळावयाची आहेत. येथील राजपूत समाजाच्या ८ टक्के मतांवर डोळा ठेवूनच भाजपकडून ‘सुशांतसिंह राजपूत जिंदाबाद’ अशी घोषणा दिली जात असल्‍याचा आरोप शिवसेनेचे प्रवक्ते तथा राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे.

जळगावातील अजिंठा विश्रामगृहात आले असताना त्‍यांनी पत्रकारांशी संवाद साधला; यावेळी ते बोलत होते. यात ते म्‍हणाले, की अभिनेता सुशांतसिंह राजपूतला न्याय देण्यासाठी राज्य सरकार विरोधात सगळ्या गोष्टी करण्यात आल्या. या प्रकरणाचा तपास सुरुवातीला मुंबई पोलिसांकडून केला जात असताना विरोधकांच्या मागणीनुसार, तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला. दीड महिने तपास केल्यानंतर त्यात काय तथ्य निघाले तर, सुशांतसिंहने आत्महत्या केली. त्याचे ड्रग्ज कनेक्शन समोर आले. आम्ही सुरुवातीपासून सांगत होतो, की सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण हे भाजपाने सोडलेले पिल्लू आहे. भाजपाला बिहारमध्ये राजपूत समाजाची असलेली आठ टक्के मते हवी आहेत. म्हणूनच ते सुशांतसिंह जिंदाबाद असे म्हणत आहेत,' अशी टीका गुलाबराव पाटलांनी केली.

पाच वर्ष आमचेच सरकार 
महाविकास आघाडी सरकार तीनचाकी सायकल असल्‍याची टीका भाजपकडून केली जात असून हे सरकार कधीही कोसळेल, असे वारंवार सांगितले जात आहे. पण भाजपकडून या टीकेला आता वर्ष पुर्ण होत आहे. पण अजूनही सरकार चांगल्या पद्धतीने काम करतेय. यापुढेही पाच वर्षे आमचे सरकार काम करतच राहतील असा दावा पाटील यांनी केला.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon gulabrao patil target bjp on bihar election