जळगाव जिल्‍ह्‍यात अतिवृष्टीग्रस्तांना १९ कोटी

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 14 November 2020

जून ते ऑक्टोबर या पाच महिन्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, असा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला होता.

जळगाव : जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना १९ कोटी ५५ लाख रुपये नुकसानभरपाई मिळाली आहे. दिवाळीपूर्वीच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्याने प्राप्त झालेल्या या मदतीमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 
जून ते ऑक्टोबर या पाच महिन्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, असा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला होता. यात जिराईत पिकांसाठी प्रतिहेक्टर दहा हजार, तर बागाईत पिकांसाठी प्रतिहेक्टरी २५ हजार अशी मदत अधिकतम दोन एकरसाठी देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. यासाठी राज्यभरातील शेतकऱ्यांना दोन हजार २९७ कोटी सहा लाख व ३७ हजार इतक्या रुपयांची तरतूद करण्यात आली होती. 
दरम्यान, या संदर्भात महसूल व वन विभागाने शासन निर्णयानुसार शेतकऱ्यांना मदत प्रदान केली आहे. यात जळगाव जिल्ह्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी १९ कोटी ५५ लाखांचा प्रस्ताव पाठविला होता. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्याने हा प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळाली आहे. यामुळे त्यांची दिवाळी गोड होणार आहे. 

प्रशासनाचे युद्धपातळीवर काम 
जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना ही नुकसानभरपाई दिवाळीच्या आधीच देण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. यानुसार महसूल प्रशासन अहोरात्र काम करून शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये मदत ट्रान्स्फर करीत असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

तालुकानिहाय मदतनिधी  
जळगाव- तीन कोटी ८१ लाख ३८ हजार, 
धरणगाव- दोन कोटी १७ लाख 
जामनेर- दहा लाख ३६ हजार 
भुसावळ- ४१ लाख ८७ हजार 
बोदवड- ७३ लाख २ हजार 
मुक्ताईनगर- ४१ लाख ३६ हजार 
एरंडोल- तीन कोटी २१ लाख २७ हजार 
पारोळा- २५ लाख ३९ हजार 
यावल- एक कोटी ११ लाख ९१ हजार 
रावेर- एक कोटी १३ लाख ३२ हजार 
अमळनेर- एक कोटी ८४ लाख ५० हजार 
चोपडा- दोन कोटी ९९ लाख ९१ हजार 
पाचोरा- तीन कोटी १४ लाख 
भडगाव- दोन कोटी १४ लाख 
चाळीसगाव- ५८ लाख. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon heavy rain loss farmer and 19 carrore fund district