अतिवृष्टीमुळे जळगाव जिल्ह्यातील तीन लाख हेक्टरला बसला तडाखा 

अतिवृष्टीमुळे जळगाव जिल्ह्यातील तीन लाख हेक्टरला बसला तडाखा 

भडगाव ः देखण्या व्यक्तीला कोणाची दृष्ट लागावी, त्याप्रमाणेच यंदा खरीप हंगामाला अतिवृष्टीची दृष्ट लागली. कपाशीचे बोंड सडून गेले, ज्वारी ‘डिस्को’ झाली, उडीद-मुगाचे जमिनीतच खत झाले, तर केळीवर सीएमव्ही रोगाच्या प्रादुर्भावामुळे ‘ती’ उपटून फेकावी लागली. अतिवृष्टीचा जिल्ह्यात साधारणतः तीन लाख हेक्टरला तडाखा बसल्याची भीती आहे. त्यामुळे अतिवृष्टीने अक्षरशः खरिपावर नांगर फिरविल्याने शेतकरी घायकुतीला आला आहे. 

यंदा कधी नव्हे एवढ्या चांगल्या प्रमाणात खरीप हंगाम बहरला होता. मात्र, सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले. यामुळे खरिपाचे पीक पाहून भरघोस उत्पादनाची स्वप्ने पाहणाऱ्या शेतकऱ्याच्या डोळ्यांत पाणी उरले आहे. उत्पादन खर्च निघाला तरी बेहत्तर, अशी परिस्थिती अतिवृष्टीने निर्माण करून ठेवली आहे. त्यामुळे खरिपासाठी घेतलेले कर्ज कसे फेडायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. 

‘पांढरे सोने’ काळवंडले 
जिल्ह्यात कापूस मुख्य नगदी पीक आहे. जवळपास पाच लाख ३० हजार हेक्टरवर कापसाची लागवड झाली आहे. त्यात दोन लाख १६ हजार हेक्टरवर पूर्वहंगामी अर्थात बागायती कपाशीची लागवड झाली आहे. यंदा वेळेवर बरसलेल्या पावसामुळे कपाशीचे पीक चांगले बहरले. मात्र, १५ दिवसांपासून सतत पाऊस कोसळत असल्याने कपाशीचे मोठे नुकसान झाले आहे. सुरवातीला बागायती कपाशीचे नुकसान झाले. आता जिरायती कपाशीचेही मोठे नुकसान होत आहे. पावसामुळे कपाशीचे सरासरी ५० टक्के नुकसान झाले असून, उत्पादन खर्चही निघण्याची सुतराम शक्यता दिसत नाही. काळवंडलेल्या कपाशीच्या बोंडामधून वेचणीचा खर्चही निघत नसल्याने कापूस उत्पादक शेतकरी अक्षरशः रडकुंडीला आला आहे. अजून पाऊस सुरूच राहिल्यास एक बोंडही शेतकऱ्याच्या हातात येणार नाही. त्यात काही भागात लाल्या रोगाने डोके वर काढल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत अधिक भर पडली आहे. 

उडीद-मुगाचे झाले खत 
जिल्ह्यात उडीद-मुगाचे ८० टक्क्यांवर नुकसान झाले आहे. अक्षरशः अनेक शेतकऱ्यांना उडीद व मूग काढायलाही सवड मिळाली नाही. त्यामुळे त्यांचे शेतातच खत झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. खरीप हंगामात २३ हजार हेक्टरवर मुगाचे, तर २१ हजार हेक्टरवर उडदाची पेरणी झाली होती. या पिकांचे नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. यंदा मूग व उडदाचे पीक उत्तम होते, पण अधिकच्या पावसाने ते वाया गेल्याने शेतकऱ्यांना उत्पादन खर्च खिशातून करावा लागला आहे. 

‘सीएमव्ही’ने केळीला धुतले 
एकीकडे अतिवृष्टीमुळे कापूस, मूग, उडीद, ज्वारी पिकाला मोठा फटका बसला. दुसरीकडे केळीवर ‘सीएमव्ही’ रोगाचा केळी पिकावर प्रादुर्भाव झाल्याने केळी अक्षरशः उपटून फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. जिल्ह्यात साधारण दोन हजार ७१४ हेक्टरवरील केळीचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाने सांगितले. यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना ५० कोटींच्या जवळपास फटका बसला आहे. या आठवड्यातच रावेर, यावल भागात वादळी पावसामुळे केळी अक्षरश: झोपून गेली. त्यामुळे उरल्यासुरल्या केळीवरही वादळाने नांगर फिरविला आहे. 

ज्वारी झाली ‘डिस्को’ 
आता ज्वारी काढण्याची वेळ आली, तरी पाऊस थांबायचे नाव घेत नसल्याने ज्वारी ‘डिस्को’ व्हायला लागली आहे. गेल्या वर्षीही अधिकच्या पावसामुळे ज्वारी काळवंडली होती. जिल्ह्यात यंदा ३७ हजार ८८० हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झाली आहे. त्यामुळे ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. काळवंडलेले धान्य हमीभाव केंद्रात खरेदी करीत नसल्याने शेतकऱ्यांना ते कवडीमोल विकावे लागणार आहे. गेल्या वर्षी तीच परिस्थिती शेतकऱ्यांच्या वाट्याला आली होती. 

कशी नशिबाने थट्टा मांडली..! 
पिंजरा चित्रपटातील ‘कशी नशिबाने थट्टा आज मांडली’ या गाण्याच्या बोलाप्रमाणे शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे. हातातोंडाशी आलेला खरिपाचा घास अतिवृष्टी, वादळ आणि ‘सीएमव्ही’च्या प्रादुर्भावामुळे हिसकावला गेला आहे. खरिपासाठी उचललेल्या कर्जाचा डोंगर कसा फेडायचा? रब्बीसाठी पैसे कुठून आणायचे? अशा एक ना अनेक प्रश्नांनी शेतकऱ्यांच्या काळजात धस्स होऊ लागले आहे. मायबाप सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित ठोस नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. 

भडगाव-पाचोरा तालुक्यात अतिवृष्टीने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. 
-किशोर पाटील, आमदार, पाचोरा-भडगाव 

अतिवृष्टीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे अगोदरच अडचणीत असलेला शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे. शासनाने सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून तुटपुंजी मदत न करता शेतकऱ्यांना शाश्वत मदत करणे गरजेचे आहे. -एस. बी. पाटील, समन्वयक, शेतकरी कृती समिती 

संपादन- भूषण श्रीखंडे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com