अतिपावसाने कांद्याचा वांधा; शेतकरी चिंतेत 

मिलींद वानखेडे
Tuesday, 29 September 2020

कांद्याचे पीक खराब होऊ लागल्याने शेतकरी धास्तावले आहेत. विशेष म्हणजे, या पिकावर महागडे रोप, लागवडखर्च, खताचा डोस आणि फवारणीचा खर्च झाला आहे

गणपूर (ता. चोपडा) : खानदेशातील कांदालागवड उत्तरार्धात आली आहे. मात्र, सुरवातीला लावलेल्या कांद्यावर रोग आल्याने या वर्षी पुन्हा गत वर्षासारखा भाव मिळण्याचे योग चुकतात की काय, अशी स्थिती निर्माण झाल्याने कांदा उत्पादक चिंतेत सापडला आहे. 

या वर्षी खानदेशात साक्री, चोपडा, यावल, शहादा, एरंडोल, अमळनेर या सर्वच भागात कांद्याचे रोप सडल्याने अपेक्षेएवढ्या क्षेत्रावर कांदालागवड झाली नाही. त्यामुळे कधी नव्हे एवढ्या महाग भावातही उत्पादकांनी शहादा, जुलवानिया, राजपूर, सेंधवा, मालेगाव, लासलगाव, निफाड आदी भागातून रोप आणून लागवड केली. सध्या ही लागवड उत्तरार्धात असतानाच कांद्यावर एका वेगळ्या रोगाचा प्रादुर्भाव होऊन रोपे बसण्यास सुरवात झाली आहे.

सुमारे ४० ते ४५ दिवसांचे कांद्याचे पीक पात पिवळसर व नंतर पांढरे होऊन जमिनीवर पडत असून, जागा विरळ होऊ लागली आहे. मुळात कांदा हे जुगारी पीक असून, त्याचा उत्पादनखर्च खूप आहे. त्यातच हा रोग आल्याने महिना ते दीड महिना झालेल्या कांद्याचे पीक खराब होऊ लागल्याने शेतकरी धास्तावले आहेत. विशेष म्हणजे, या पिकावर महागडे रोप, लागवडखर्च, खताचा डोस आणि फवारणीचा खर्च झाला आहे. 

जास्त पावसामुळे व मध्यंतरी सलग पाऊस राहिल्याने पिळकुटी नावाचा रोग आला असून, तो आपल्याकडे कधीतरी कांद्याच्या पिकावर येतो. तोकडे पाणी देऊन जमिनीलगत बुरशीनाशक मारणे त्यासाठी गरजेचे आहे. 
-प्रा. श्रीधर देसले, कांदातज्ज्ञ, धुळे 

महिनाभर जोमदार दिसणाऱ्या कांद्याच्या पिकावर रोग आल्याने पिकाची अवस्था खराब झाली आहे. झालेला खर्च पाहता पीक सुधारणे गरजेचे आहे. 
-गुलाब न्हावी, कांदा उत्पादक शेतकरी, गणपूर 
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news pachora Farmers worried over heavy crop damage due to onion crop