थरारक...तो महामार्गाने वाहने उडवतच सुसाट निघाला; पन्नास वाहनांना धडक

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 26 July 2020

मलकापूर येथे केमिकलचा माल खाली करून मुंबईकडे परतणाऱ्या कंटेनर चालकाने वाहने उडविली. हा प्रकार नेरी ते जळगाव शहर आणि शहरातून अजिंठा चौफुली ते स्टेशनरोड दरम्यान भरधाव कंटेनर चालकाने वाहने उडविल्याचा थरारक घटना घडली.

जळगाव : महामार्गावरून सुसाट वेगाने कंटेनर चालवत असणाऱ्या मद्यधुंद चालकाला समोरून येणारे वाहन देखील दिसत नव्हते. आपल्‍या धुंदीत सुसाटपणे कंटेनर चालवत त्‍याने तब्‍बल पन्नास वाहनांना धडक देत पुढे जात होता. यात एका जणाचा मृत्‍यू झाल्‍याची घटना घडली आहे. 

मलकापूर येथे केमिकलचा माल खाली करून मुंबईकडे परतणाऱ्या कंटेनर चालकाने वाहने उडविली. हा प्रकार नेरी ते जळगाव शहर आणि शहरातून अजिंठा चौफुली ते स्टेशनरोड दरम्यान भरधाव कंटेनर चालकाने वाहने उडविल्याचा थरारक घटना घडली. नेरी ते जळगावदरम्यान साधारण पन्नासपेक्षा अधिक वाहने उडविल्याचा अंदाज आहे. कंटेनर चालक भाऊसाहेब खांडवे (वय ३९, रा. कर्हे वडगाव ता. आष्टी जि. बीड) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

वाहनाला धक्‍का अन्‌ सुरू झाला पाठलाग
मलकापूरमध्ये कंटेनर (एमएच २३, एयु ४४३३) हा कंटेनर मुंबईकडे जात होता. दरम्यान कंटेनर चालकाने महामार्गावर काही वाहनांना धडक दिली असता तो न थांबताच सुसाट निघाला होता. दरम्‍यान संबंधित वाहनचालक त्‍याचा पाठलाग करत होते; यामुळे भीतीने कंटेनर चालकाने कंटेनर अधिक भरधाव वेगाने पळविला. मद्याच्या नशेत असलेल्या या चालकाने रस्त्यात समोर येणाऱ्या अनेक वाहनांना धडक दिल्‍याचे सांगण्यात येत आहे. यात एक दुचाकीस्वार ठार झाला असल्याची माहिती मिळाली आहे. 

तावडीत सापडताच दिला चोप
शहरातील रहदारीच्या मार्गावरून कंटेनर घालत चालकाने अजिंठा चौफुली, चित्रा चौक, टॉवर चौक मार्गे कंटेनर रेल्वे स्टेशन समोर थांबविला. दरम्‍यान त्याच्या मागावर असलेल्या नागरिकांनी त्‍याला लागलीच पकडून चांगलाच चोप दिला. घडलेल्‍या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर बंदोबस्तावर असलेल्‍या पोलिसांनी चालक खांडवे यास ताब्यात घेत शहर पोलिस ठाण्यात आणले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon highway speedily contenor Beat vehical