मालवाहू गाडी, दुचाकी, ट्रकचा तिहेरी विचित्र अपघात 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 11 December 2020

दुचाकीस्वार नन्नवरे हे फुटबॉलसारखे उडून रस्त्यालगत असलेल्या खड्डयात पडले. मालवाहू वाहनाचा समोरुन चक्काचूर झाला होता. 

जळगाव : राष्ट्रीय महामार्गावर आहुजानगरजवळ दुचाकीला मागून जोरदार धडक देत मालवाहू वाहन समोरुन येणाऱ्या ट्रकवर धडकून विचित्र अपघात घडला. यात दोघे गंभीर जखमी झाले असून दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 
एसटीतील निवृत्त निरीक्षक पंढरी नामदेव नन्नवरे रा. बांभोरी यांचे जळगाव शहरातील आहुजानगर येथेही घर आहे. ते शुक्रवारी सकाळी बांभोरी येथून दुचाकीने (एमएच १९ एडब्लू ९१०२) आहुजानगर येथे येत होते. त्यांच्या पाठोपाठ मालवाहू वाहन (एमएच १९ एस.६७५७) जळगावकडे येत होते. मालवाहू वाहनाने ओव्हरटेकच्या नादात समोर नन्नवरे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यानंतर मालवाहू वाहन समोरुन पाळधीकडे जात असलेल्या ट्रकवर (युपी ७२ एटी ३५६५) धडकले. त्यात दुचाकीस्वार नन्नवरे हे फुटबॉलसारखे उडून रस्त्यालगत असलेल्या खड्डयात पडले. मालवाहू वाहनाचा समोरुन चक्काचूर झाला होता. 

पोलिसांची मदत 
याचवेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस हेडकॉन्स्टेबल विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, राजेंद्र पवार, प्रीतम पाटील, नंदलाल पाटील, भगवान पाटील हे तपासासाठी एरंडोलकडे जात होते. त्याच्यासमोरच अपघाताची घटना घडल्याने त्यांनी मालवाहू वाहनाचा दरवाजा तोडून चालक अशोक रोकडे यास बाहेर काढले. तसेच ताब्यात असलेल्या शासकीय वाहनातून तत्काळ देवकर रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे चालकाचे प्राण वाचले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon highway three vhaical accident two porson injured