रूग्‍णसेवा कोलमडली; आयएमएच्या बंदने ओपीडीचा दरवाजा बंद

राजेश सोनवणे
Friday, 11 December 2020

आयएमएने पुकारलेल्‍या बंदला जळगाव शाखेने पाठिंबा दर्शवत सहभाग नोंदविला होता. आयएमएच्या बंदमुळे जळगावातील दवाखाने अत्यावश्यक सेवा वगळता बंद आहेत.

जळगाव : 'सीसीआयएम'ने (सेंट्रल काउंसील ऑफ इंडियन मेडिसिन) आयुर्वेदिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण घेतल्यानंतर 58 प्रकारच्या ऍलोपॅथिक शस्त्रक्रिया करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरुद्ध 'आयएमए'ने आज (शुक्रवारी) देशव्यापी बंद पुकारला होता. दिवसभर रूग्‍णसेवा बंद असल्‍याने तपासणीसाठी आलेल्‍या रूग्‍णांना माघारी जावे लागत होते.

आयएमएने पुकारलेल्‍या बंदला जळगाव शाखेने पाठिंबा दर्शवत सहभाग नोंदविला होता. आयएमएच्या बंदमुळे जळगावातील दवाखाने अत्यावश्यक सेवा वगळता बंद आहेत. सीसीआयएमच्या अधिसूचनेत बीएएमएस झालेल्या आयुर्वेदच्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षणात 58 ऍलोपॅथिक शस्त्रक्रिया करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सीसीआयएमने घेतलेल्या या निर्णयाच्या विरोधात आयएमएने देशव्यापी बंद पुकारला आहे. या बंदला पाठिंबा देण्यासाठी आयएमएच्या जळगाव जिल्हा शाखेने जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दवाखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या बंद दरम्‍यान आयएमएतर्फे निदर्शने करण्यात आली. यावेळी जळगाव आयएमएचे अध्यक्ष डॉ. दीपक पाटील, सचिव डॉ. स्‍नेहल फेगडे, डॉ. विलास भोळे, डॉ. राधेश्‍याम चौधरी यांच्यासह पदाधिकारी व डॉक्‍टर उपस्‍थित होते.

साडेसहाशे डॉक्‍टरांचा सहभाग
आयएमएने पुकारलेल्या या बंदमध्ये जिल्‍ह्‍यातून साधारण साडेसहाशे डॉक्‍टरांचा सहभाग होता. याशिवाय मेडिकल स्टूडंटस नेटवर्क या आएमएच्या पदवीपूर्व विद्यार्थ्यांच्या शाखेतर्फे एमबीबीएसचे शिक्षण घेणारे विद्यार्थी देखील बंदमध्ये सहभागी झाले होते. 

रूग्‍णांना जावे लागले माघारी
आयएमएने पुकारलेल्‍या बंदमुळे दिवसभर रूग्‍णालयातील ओपीडी बंद ठेवण्यात आली होती. यामुळे नियमित तपासणीसाठी येणाऱ्या रूग्‍णांना दवाखाने बंद असल्‍याने माघारी फिरावे लागले होते. काही रूग्‍ण व त्‍यांचे नातेवाईक रूग्‍णालया बाहेर येवून डॉक्‍टरांशी संपर्क करत असल्‍याचे चित्र देखील पाहण्यास मिळाले. 

'आयएमए'च्या मागण्या
'सीसीआयएम'ने अधिसूचना त्वरित मागे घ्यावी, राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेकडून तयार करण्यात आलेल्या चार समित्या तातडीने रद्द कराव्यात, वैद्यकीय शाखांची सरमिसळ करण्याऐवजी प्रत्येक शाखेचा वेगळा विकास करून, जनतेला त्याचा जास्तीत जास्त उपयोग कसा होईल यावर सरकारने भर द्यावा. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon ima strike and hospital opd closed today