खडसेंच्या पुढाकाराने कंत्राटी डॉक्टरांच्या थकीत वेतनाचा प्रश्न अखेर सुटला 

देविदास वाणी
Wednesday, 23 September 2020

कंत्राटी डॉक्टर्स व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर ॲड. रोहिणी खडसे यांनी ‘एनआरएचएम’चे आयुक्त एन. रामास्वामी आणि राज्य कुटुंब कल्याण विभागाच्या अतिरिक्त संचालक डॉ. अर्चना पाटील यांच्याशी कंत्राटी डॉक्टर्सच्या थकीत वेतनाबाबत फोनवर चर्चा केली होती.

जळगाव  ः जिल्ह्यातील कंत्राटी डॉक्टरांच्या थकीत वेतनाचा प्रश्‍न मार्गी लागला असून, हे वेतन त्यांच्या खात्यात जमा झाले आहे. वेतनासाठी डॉक्टरांनी माजी मंत्री एकनाथराव खडसे व जिल्हा बँकेच्या अध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे यांच्याकडे पाठपुरावा करण्यासाठी गार्हाणे मांडल्यानंतर हा प्रश्‍न मार्गी लागला आहे. 

डॉक्टरांच्या वेतनप्रश्‍नी श्री. खडसे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी संवाद साधून जिल्ह्यासह राज्यातील स्थायी व कंत्राटी वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन लवकर द्यावे म्हणून चर्चा केली होती. त्यावर आरोग्यमंत्र्यांनी राज्यातील कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांकरिता येत्या आधिवेशनात विशेष निधीची तरतूद केली जाईल व येत्या दोन आठवड्यांत डॉक्टरांसह सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे थकीत मासिक वेतन देण्याचे आश्वासन दिले होते. 

दरम्यान, कंत्राटी डॉक्टर्स व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर ॲड. रोहिणी खडसे यांनी ‘एनआरएचएम’चे आयुक्त एन. रामास्वामी आणि राज्य कुटुंब कल्याण विभागाच्या अतिरिक्त संचालक डॉ. अर्चना पाटील यांच्याशी कंत्राटी डॉक्टर्सच्या थकीत वेतनाबाबत फोनवर चर्चा केली होती. त्यावेळी एन. रामास्वामी यांनी तातडीने जळगाव जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पोटोडे यांच्याशी चर्चा केली. राज्य सरकारकडून निधी उपलब्ध नसल्याचा मुद्दा डॉ. पोटोडे यांनी अवगत करून दिल्यानंतर एन. रामास्वामी यांनी याप्रश्नी आरोग्यमंत्री टोपे यांच्याशी बोलणे केले होते. त्यानंतर आज जिल्ह्यातील शेकडो कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या खात्यावर मासिक वेतन जमा करण्यात आल्याने जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त केला जात आहे. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon issue of salary of contract doctors escaped Khadse's efforts